जालना : जालना लोकसभा मतदारसंघावर सलग पाच वेळा भाजपचे कमळ फुलविण्याची किमया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी साधली आहे. आगामी निवडणुकीत षटकार मारण्याच्या उद्देशाने ते मैदानात उतरले असून त्यांची यंत्रणाही कामाला लागली आहे. दुसरीकडे विरोधी गटातील महाविकास आघाडीचा उमेदवारच अद्याप निश्चित झालेला नाही. विशेषत: काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाकडूनही जालन्याच्या जागेवर दावेदारी सांगितली जात आहे.
लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता तीन निवडणुकांचे अपवाद वगळले तर जालना मतदारसंघातील मतदारांनी नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या बाजूने मतदान करीत खासदार निवडले आहेत. १९८० व १९८४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळासाहेब पवार विजयी झाले होते. १९९१ मध्ये काँग्रेसकडूनच अंकुशराव टोपे यांनी निवडणुकीत विजय मिळविला होता, तर भाजपकडून पुंडलिक हरी दानवे हे १९८९ मध्ये, उत्तमसिंग पवार यांनी १९९६ व १९९८ असा दोनवेळा विजय मिळविला. त्यानंतर मात्र १९९९ पासून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सलग पाच वेळा जालन्याचे खासदार होण्याची किमया साधली आहे. २०१९च्या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली होती. त्यावेळी दानवे यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा पराभव केला होता. आगामी निवडणुकीसाठीही महायुतीकडून दानवे यांचे नाव अंतिम आहे. महायुतीतील मित्र पक्षांच्या बैठकीत दानवे यांना अधिक मतांनी विजयी करण्याचा निर्धारही करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीची केवळ चर्चाभाजपचा उमेदवार निश्चित असताना महाविकास आघाडीकडून अद्याप जालन्याची जागा कोणत्या पक्षाने लढवायची यावरच खल चालू आहे. या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत ही जागा कुणाला सुटते त्यावर उमेदवारी अवलंबून आहे. तूर्तास महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार शिवाजी चोथे, हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांची नावे चर्चेत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सूचित करण्यात आल्याचे बोलले जाते. काँग्रेसकडून माजी आमदार कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, संजय लाखे पाटील यांच्या नावाची चर्चा आहे
वंचितचीही एन्ट्रीवंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून, जागा वाटपावर अद्यापही चर्चा सुरू आहे. त्यातच ‘वंचित’कडून जालना लोकसभेसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांची उमेदवारी अंतिम झाली नाही किंवा महाविकास आघाडीसोबत ‘वंचित’चे जमले नाही तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांचेही नाव चर्चेत आहे.