औरंगाबादमध्ये केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सुरू करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. मागील ३७ वर्षांपासून ते या संघटनेचे अध्यक्ष होते. याशिवाय महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष, अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
उल्लेखनीय,म्हणजे औषधी भवनची संकल्पना त्यांचीच होती. त्यांच्याच पुढाकाराने १९९१ मध्ये भारतातील पहिले औषधी भवनचे औरंगाबादमध्ये उद्घाटन झाले. त्यानंतर देशभरात असे औषधी भवन उभारण्यात आले.
त्यांनी औषध विक्रेत्यांच्या विविध प्रश्नांना वाच्या फोडली. एवढेच नव्हे, तर मागण्या मान्य करण्यासाठी सरकारी दरबारी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच व्हॅट, एलबीटीविरोधात जिल्हा व्यापारी महासंघाने पुकारलेल्या आंदोलनातही त्यांनी संघटनेच्या माध्यमातून मोठी ताकद महासंघाच्या पाठीमागे उभी केली होती.
खेडकर यांनी मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कडक शिस्त, रोखठोक स्वभाव यामुळे संघटनेतच नव्हे, तर राज्य व अखिल भारतीय संघटनेत त्यांच्या नावाचा मोठा दरारा होता.
लायन्स क्लबतर्फे दरवषी आयोजित प्लास्टिक सर्जरी शिबिरात मोफत औषधी पुरविण्यास त्यांनी पुढाकार घेतला होता, तसेच दुष्काळात संघटनेच्या माध्यमातून काही गावे दत्तक घेऊन त्यांनी त्या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला होता.
त्यांच्या पाश्चत पत्नी, २ मुली, १ मुलगा, सून व जावई, असा परिवार आहे.
चौकट
दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली
खेडकर यांच्या निधनाची बातमी बुधवारी जिल्ह्यात पसरली. यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व औषधी दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.