औरंगाबाद : १४ वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणारा किरण रमेश मुजमुले याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी सोमवारी (दि. १५ जुलै) दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला.१९ डिसेंबर २०१२ रोजी सदर मुलीला तिच्या वडिलांनी शाळेत सोडले होते. तेव्हापासून मुलगी तिच्या आईच्या दागिन्यांसह बेपत्ता झाली होती. सहा महिन्यांपूर्वी संबंधित मुलगी चित्रकलेची परीक्षा देण्यासाठी पैठणला गेली असता, किरण रमेश मुजमुले (२२, रा. भगूर, ता. शेवगा, जि. नगर) याने तिच्या शेजारी बसून परीक्षा दिली होती. तेव्हापासून तो मुलीच्या संपर्कात होता. ३ नोव्हेंबर २०१२ रोजी आरोपी मुलीच्या घरी आला होता. तेव्हा ‘मुलीला वाईट वळण लावू नको’असे फिर्यादी व त्यांच्या पत्नीने आरोपीला समजावून सांगितले होते. त्यावेळी ‘तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे’ असे बोलून तो निघून गेला होता. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी मुलगी घरातून निघून गेल्याची घटना घडली होती.फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पैठण पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३६३ आणि ३६६ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात आरोपीने मुलीला अहमदनगर, झाशी, वाराणसी येथे नेल्याचे व तेथे दोघे लॉजवर थांबल्याचे स्पष्ट झाले. वाराणसीहून ते दिल्लीला गेले. २४ डिसेंबर २०१२ रोजी रेल्वे सेवा बंद होती म्हणून दोघे रेल्वेस्टेशनवर थांबले होते. मात्र टवाळखोरांनी त्यांना त्रास दिल्यानंतर मुलीने तिच्या भावाला फोन करून सांगितले होते व तिच्या भावाने गाझियाबादमधील त्याच्या मित्राला रेल्वेस्टेशनवर पाठविले होते. त्यानंतर तो मित्र दोघांना आपल्या घरी घेऊन गेला व २७ डिसेंबर २०१२ रोजी आरोपी व मुलगी औरंगाबादला पोहोचले.आरोपीने अत्याचार केल्याचा जबाब मुलीने दिल्यानंतर आरोपीला अटक करून अॅट्रॉसिटीसह भादंविचे कलम ३७६ समाविष्ट करण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३६३ अन्वये सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, तर कलम ३७६ (२)(आय)(एन) कलमान्वये दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला.------------
अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्याला सश्रम कारावास आणि दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:35 PM