खुलताबाद : सीआरपीएफ पोलीस दलाच्या ४२ वर्षीय जवानाने पीडित महिलेस धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने या गैरकृत्याचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढून सोशल मीडियावर टाकून पीडितेची बदनामी केल्याप्रकरणी खुलताबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गल्लेबोरगाव (ता. खुलताबाद) येथील ४२ वर्षीय महिलेला सीआरपीएफ पोलीस दलातील जवान गणेश बबन गिरी (४२, रा. वाजोंळी, ता. अहमदनगर) याने ऑगस्ट २०१७ ते मार्च २०१९ या काळात मुंबईत तर २०२० मध्ये गल्लेबोरगावात आल्यानंतर पीडितेस मी सीआरपीएफ पोलीस दलात नोकरीला आहे. मी तुझ्या बहिणीला व मुलीला मारून टाकीन, अशी धमकी देत पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान गणेश गिरीने नकळत तिची अश्लील व्हिडीओ क्लीप व फोटो तयार करून बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच ऑगस्ट २०२१ या महिन्यात फोन करून तीन लाख रुपये दे, नाहीतर तुझे अश्लील व्हिडीओ लोकांना पाठवून तुझी बदनामी करतो, अशी धमकी दिली. यादरम्यान ३१ ऑगस्ट रोजी पीडितेच्या मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून संबंधित अकाउंटवर अश्लील व्हिडीओ क्लीप व फोटो अपलोड करून पीडितेची बदनामी केली. त्यामुळे पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश बबन गिरी याच्याविरोधात खुलताबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे करत आहेत.