औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन पक्षातून (एमआयएम) अलीकडेच हकालपट्टी करण्यात आलेला आणि सातत्याने वादग्रस्त ठरलेला नगरसेवक सय्यद मतीनवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात मंगळवारी (15 जानेवारी) एका 30 वर्षीय महिलेनं मतीनविरोधात बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे.
आधार कार्ड बनवून देतो, नोकरी मिळवू देतो, असे सांगत मतीनने अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. पीडित महिला आपल्या पतीपासून विभक्त झाली आहे. महिलेला दोन मुले असून ती तिच्या आईसोबत राहते. आधार कार्ड बनवण्यासाठी वर्षभरापूर्वी प्रगती कॉलनी, आसेफिया कॉलनी वॉर्डातून निवडून आलेला नगरसेवक सय्यद मतीनच्या कार्यालयात गेली होती. मतीनने तिला आधारकार्ड बनवून देतो, नोकरीही मिळूनही देतो, तसेच लग्न करतो, अशी थाप मारून तिच्याशी जवळीक निर्माण केली. रशीदपुरा आणि टाऊन हॉल येथे घेतलेल्या घरात त्याने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला, असा आरोप पीडितेनं केला आहे.
यानंतर, घटनेची वाच्यता कोठेही केल्यास जिवे मारेन, अशी धमकीदेखील दिल्याचे महिलेने पोलिसांनी सांगितले. मतीनने लग्नास नकार दिल्यानंतर महिलेने याबाबत पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिका-यांची भेट घेऊन मतीनविरुद्ध तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी मतीनविरुद्ध रीतसर कारवाई करण्याचे आदेश सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब शिंगारे यांना दिले. मंगळवारी (15 जानेवारी) रात्री अखेर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सय्यद मतीन सय्यद रशीदविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असताना नगरसेवक मतीन बेपत्ता झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.