औरंगाबाद : आईला अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या बापाच्या डोक्यात वरवंटा मारून खून करणारा मुलगा अमोल मधुकर खंडागळे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ‘सदोष मनुष्यवधा’च्या आरोपाखाली ५ वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.
मुकुंदवाडी परिसरातील राजनगरात ट्रकचालक मधुकर खंडागळे आपल्या कुटुंबियांसमवेत राहत होते. २१ नोव्हेंबर २०१२ रोजी मधुकर यांची पत्नी सोजराबाई लहान मुलाला सोबत घेऊन भावाच्या घरी गेल्या होत्या. रात्री दहा वाजता मधुकर खंडागळे दारूच्या नशेत अमोल आणि त्याच्या आईला शिवीगाळ करीत होते. अमोल समजावण्यास गेला तरी ते ऐकत नसल्यामुळे रागाच्या भरात अमोलने बापाच्या डोक्यात वरवंटा मारून खून केला. त्यानंतर आई सोजराबाईला घटना सांगितली. सोजराबाईने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी अर्धवट बेशुद्धावस्थेत मधुकर खंडागळे यांना घाटी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सोजराबाईच्या तक्रारीवरून मुलगा अमोलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक ए. एन. घुले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता मधुकर आहेर यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात फिर्यादी महिला फितूर झाली. अभियोग पक्षाने उलट तपासादरम्यान अनेक बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. परिस्थितीजन्य पुरावा, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष यांचा विचार करून न्यायालयाने अमोलला वरीलप्रमाणे शिक्षा आणि दंड ठोठावला. पैरवी अधिकारी संजय बहिरव आणि दीक्षित यांनी सरकारी वकिलांना सहकार्य केले.