औरंगाबाद : चुकून बँकेच्या खात्यावर जमा झालेला ३ लाख ५६ हजार ८७४ रुपयांचा धनादेश बँकेला परत न करता ती रक्कम एटीएम व धनादेशाव्दारे काढून ‘मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार’ केल्याच्या आरोपाखाली व्यापारी बाबासाहेब दामोधर कापसे (३२, रा. गजानन नगर, औरंगाबाद) याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.के. कुरंदळे यांनी भादंवि कलम ४०३ अन्वये सहा महिने सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड ठोठावला.
यासंदर्भात अभ्युदय को.आॅ बँक प्रा.लि गारखेडा शाखेचे व्यवस्थापक सुनिल उमाकांत महाशब्दे (५१, रा. दीपनगर, औरंगाबाद) यांनी तक्रार दिली होती की, ७ जुलै २०१४ रोजी अभ्युदय बँकेच्या भिवंडी येथील शाखेला ३ लाख ५६ हजार ८७४ रुपयांचा धनादेश मे. श्रीकर कॉटन कंपनीच्या येस बँकेच्या चालू खात्यावर टाकायचा होता.
मात्र, नजर चुकीने तो धनादेश आरोपी कापसे याच्या अभ्युदय बँकेतील राज मुद्रा असोसिएट या खात्यावर जमा झाला. आरोपीने चौकशी न करता १० ते १६ जुलै २०१४ दम्यान ती रक्कम एटीएम व धनादेशाव्दारे काढून घेतली. चूक लक्षात येताच सुनिल महाशब्दे यांनी आरोपीला नजरचुकीने तो धनादेश तुमच्या खात्यावर जमा झाला होता, त्यामुळे ती रक्कम पून्हा बँकेत जमा करावी, असे कळविले.
परंतु आरोपीने कोणाताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बँकेने आरोपीला नोटीस पाठविली असता आरोपीने ती घेतली नाही. यासंदर्भात जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील सुनिल जोंधळे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला. पैरवी अधिकारी मंजूर हुसेन यांनी सहकार्य केले.