औरंगाबाद : अल्पवयीन मुलीला फू स लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणारा जितेंद्र यमाजी गायकवाड याला सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी बुधवारी (दि. ३ जुलै) पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.या संदर्भात पीडित मुलीच्या पित्याने फिर्याद दिली होती की, १६ सप्टेंबर २०११ रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास ते लघुशंकेसाठी उठले होते. त्यांचा दरवाजा बाहेरून लावलेला होता. त्यामुळे शंका आल्याने त्यांनी त्यांची मुलगी झोपली होती तेथे जाऊन पाहिले असता, ती तिथे दिसली नाही. घरात व घराबाहेर तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. मुलीशी वारंवार जवळीक साधणारा आणि शेजारी राहणारा जितेंद्र यमाजी गायकवाड (२८) हादेखील त्याच्या घरात नसल्याचे आढळल्याने त्यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा फिर्यादीचा संशय बळावला. त्यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३६३ आणि ३६६ अन्वये चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.१८ सप्टेंबर २०११ रोजी रात्री मुलगी व आरोपी औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आढळल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आरोपीने दोन ते तीन वेळा अत्याचार केल्याचा जबाब मुलीने दिला होता. पोलिसांनी तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहायक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीनेच मुलीला घरातून पळवून नेल्याचे सिद्ध झाल्याचा युक्तिवाद अॅड. पहाडिया यांनी केला. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३६३ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला.
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्याला सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 11:37 PM