वाळूज महानगर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फिरण्याच्या बहाण्याने तिला दुचाकीवरून पळवून नेऊन अत्याचार केल्याची घटना वाळूज महानगरात घडली. या प्रकरणी आरोपी सोमेश भिकुलाल मुंगे (२२, रा. तीसगाव) यास पोलिसांनी अटक केली.
वाळूज महानगर परिसरातील १५ वर्षीय मुलगी शुक्रवारी (दि.४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली होती. सर्वत्र शोधाशोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिच्या आईने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बेपत्ता झालेली ती रविवारी (दि.६) सिडको वाळूज महानगरातील उद्यानाजवळ भेदरलेल्या अवस्थेत बसल्याची माहिती नागरिकांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ सिडको उद्यान गाठत तिला ताब्यात घेतले व पालकांना ठाण्यात बोलावून घेतले. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन धीर देत चौकशी केली असता तिने आपली काही दिवसांपूर्वी तीसगावच्या सोमेश मुंगसे या तरुणासोबत ओळख झाल्याचे सांगितले. या ओळखीतून सोमेश व तिची चांगलीच मैत्री झाली. सोमेशने तिला शुक्रवारी बाहेर फिरायला जाऊन येऊ, अशी थाप मारून बोलावून घेतले.
तीसगावच्या डोंगर परिसरात अत्याचारघरातुन बाहेर पडल्यानंतर सोमेशने तिला दुचाकीवर बसवून तीसगावच्या खवड्या डोंगर परिसरात नेले. निर्जनस्थळी गेल्यानंतर संधी साधून जबरदस्तीने अत्याचार केला. या घटनेची कुठेही वाच्यता करू नकोस अशी धमकी देऊन रात्री तिला तीसगाव परिसरातील आपल्या घरी नेले.
स्वत:च्या घरात दिला आश्रयसोमेशच्या कुुटुंबीयांनी सोबत असलेल्या मुलीची चौकशी केली असता त्याने ही मैत्रीण असल्याचे सांगितले. तिच्या घरी कुणीही नसल्याने येथे आणल्याचा बहाणा केल्याने कुटुंबीयांनी तिला घरात आश्रय दिला. दुसऱ्या दिवशी सोमेशने मैत्रिणीला दुचाकीवरून सिडको वाळूज महानगरातील उद्यानाजवळ सोडून पसार झाला. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. पोलिसांनी रविवारी सांयकाळी वाळूज एमआयडीसी परिसरातून आरोपी सोमेश मुंगसे यास अटक केली. आरोपी सोमेश मुंगसे यास न्यायालयात हजर केले असता त्यास गुरुवार (दि.१०)पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पागोटे हे तपास करीत आहेत.