औरंगाबाद : विवाहितेचा अंघोळ करताना व्हिडिओ बनविला. या व्हिडिओच्या आधारे विवाहितेला ब्लॅकमेल करीत वेरूळ परिसरात नेऊन अनेक वेळा अत्याचार केले. विवाहितेने अत्याचार करणाऱ्यासोबत बोलणे तोडल्यानंतर आरोपीने विवाहितेच्या पतीला दोघांचे अश्लील व्हिडिओ पाठविल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली.
भानुदास किसन घोडे (वय ४०, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. भानुदास बांधकाम मिस्त्री आहे. त्याच्याकडे पीडितेचा पती तीन वर्षांपूर्वी कामाला होता. त्यामुळे घोडेचे पीडितेच्या घरी येणे जाणे होते. यातूनच घोडे याने पीडितेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वी मोबाईलमध्ये बनविला. त्यानंतर आठ दिवसांनी त्याने हा व्हिडिओ नवऱ्यासह नातेवाइकांना पाठविण्याची धमकी देत वेरुळ येथील लॉजवर नेऊन बळजबरीने अत्याचार केले. त्याचाही व्हिडिओ बनविला. या व्हिडिओच्या आधारे त्याने ब्लॅकमेल करीत अनेक वेळा अत्याचार केले.
मागील महिन्यात जय भवानी चौकातील मातोश्री लॉजवर नेऊन अत्याचार केले. त्यावेळी घोडेचा मोबाईल पीडितेने पाण्यात टाकला. मोबाईल पाण्यात टाकल्यामुळे त्यातील व्हिडिओ डिलिट झाल्यामुळे त्याच्यासोबत बोलणे पीडितेने सोडून दिले. २७ जुलैला घोडेने पीडितेला त्याच्याकडे असलेले व्हिडिओ व फोटो पतीसह नातेवाइकांना पाठविण्याची धमकी दिली. यानंतर २ ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता अनोळखी नंबरवरून पीडितेचा पती आणि बहिणीच्या नवऱ्याच्या मोबाईलवर घोडे आणि पीडितेचे वेरुळ लॉजवर काढलेले व्हिडिओ आणि फोटो पाठविण्यात आले. यानंतर पीडितेने पतीला सोबत घेत मुकुंदवाडी ठाणे गाठले. त्या ठिकाणी घोडेविरोधात अत्याचाराची तक्रार दिली. त्यानुसार निरीक्षक गिरी यांनी गुन्हा नोंदवित आरोपीला बेड्या ठोकल्या.