औरंगाबाद: नोकरीनिमित्ताने शहरात राहणाऱ्या परप्रांतीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे, पीडिता आणि आरोपी यांनी यापूर्वी शहरातील पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदविले आहेत.
अतिक सिद्दीक मोतीवाला ( रा. मेमननगर) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार पीडितेने याविषयी छत्तीसगडची राजधानी रायपूर शहरातील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. छत्तीसगड पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून हे प्रकरण तपास करण्यासाठी औरंगाबाद शहर पोलिसांकडे वर्ग केले. सातारा ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनिता फसाटे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
पीडितेच्या तक्रारीनुसार, नोकरीनिमित्ताने ती २०१४ ते २०१६ या कालावधीत औरंगाबादेत राहत होती तेव्हा आरोपी अतिकसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाली. ५ एप्रिल २०१५ रोजी अतिक रेल्वेस्टेशन परिसरातील पीडितेच्या फ्लॅटवर गेला. तेथे त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्यांच्यात अनेकदा संबंध आले. पीडितेने लग्नासाठी आग्रह धरला असता आरोपीने टाळाटाळ केली. यादरम्यान अतिक विवाहित असल्याचे पीडितेला समजले. २०१८ मध्ये पीडिता सुरत येथे नोकरीसाठी गेल्यावर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबादला बोलावून घेतले. अतिकने तिच्याकडून पैसे नेले, मात्र परत केले नसल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. २० नोव्हेंबर २०२० मध्ये त्याने अत्याचार केल्याचे नमूद केले. त्याच्याकडे तिचा व्हिडिओ आणि छायाचित्र आहेत. हे छायाचित्र आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने घाबरल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. पीडिता तिच्या गावी गेली. तेथे तिने अतिकविरूद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली.