औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय अर्थात राज्य कर्करोग संस्थाच्या किरणोपचार विभागाच्या विस्तारीकरणाचे १५ नोव्हेंबर २०२० रोजी सुरू झालेले बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील तीन महिन्यांत हे काम पूर्ण होऊन कर्करोग रुग्णांना १६५ वाढीव खाटा उपचारासाठी उपलब्ध होतील. याशिवाय ऑन्कोलाॅजी हेड-नेक, गायनिक, पॅथालाॅजी या विषयांत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण सुरू होऊन आणि संशोधनालाही गती मिळणार आहे.
शासकीय कर्करोग रुग्णालयाला १५ ऑक्टोबर २०१६ रोजी राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला. त्यानंतर केंद्राच्या ‘एनपीसीडीसीएस’ योजनेतून ९६.७० कोटींचा प्रकल्प मंजूर झाला. यातून १०० खाटांच्या या रुग्णालयात आणखी १६५ खाटांचे विस्तारीकरण ३८.७५ कोटींचे बांधकाम व उर्वरित ५८.५२ कोटींच्या निधीतून किरणोपचारासह अद्ययावत यंत्रसामग्री खरेदी करण्यात येणार आहे. बांधकामासाठी आतापर्यंत कंत्राटदाराला चार टप्प्यांत २० कोटी ३० लाख रुपये वर्ग करण्यात आले असून, ८० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
निम्म्याहून अधिक यंत्रे दाखलयंत्रासाठी ५८ कोटींचा निधी हाफकिन महामंडळाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आतापर्यंत ४८ कोटींच्या यंत्रांच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यातील एमआरआय, टू डी इको, ओटी लाइट, ट्यूमर मार्कर, इम्युनोहिस्ट्रीसंबंधीचे यंत्र, डिजिटल एक्स-रे अशा त्यासाठी आवश्यक साहाय्यभूत यंत्र अशी यंत्रं निम्म्याहून अधिक यंत्रे दाखल झाली आहेत.
विद्युतीकरण, प्लोअरिंग, प्लम्बिंगच्या कामांना गतीविस्तारीकरणात किरणोपचार विभागाच्या व्हर्टिकल एक्सटेन्शन बांधकामांतर्गत सध्याच्या मुख्य इमारतीवर बांधकाम पूर्णत्वास आले आहे. शिवाय आणखी एक बंकर उभारण्यात आले असून, त्यावर दोन मजले बांधण्यात आले आहेत. १० पेइंग रूम, १० बालकर्करोग रुग्णांच्या आयसोलेशनच्या खोल्या, ओपीडीला जोडून ओपीडी, शस्त्रक्रिया कक्ष, स्वतंत्र किचन, ईटीपी एसटीपी प्लांट यांची उभारणी प्रगतिपथावर असून, सध्या टाइल्स बसवणे, विद्युतीकरण, दरवाजे खिडक्या, प्लम्बिंग, फ्लोअरिंगच्या कामांनी गती घेतली आहे.
सबस्टेशनची उभारणीविस्तारीकरणानंतर वाढलेल्या यंत्रसामग्रीमुळे अधिक दाबाचा वीजपुरवठा लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र सबस्टेशनची उभारणी करण्यात येत आहे. त्याशिवाय ट्रान्स्फॉर्मर, जनरेटरची व्यवस्थाही संस्थेत केली जात आहे. सध्या सर्जिकल, मेडिकल ऑक्नॉलॉजी, एमडी रेडिओ थेरपी या विषयातील पदव्युत्तर शिक्षणाला संस्थेत सुरुवात झाली असून, भविष्यात इतरही अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न असतील, असे डाॅ. गायकवाड यांनी सांगितले.