बोअरवेलला मुबलक पाणी: मनपा टँकरच्या फेऱ्या झाल्या कमी
-साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद : यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सातारा-देवळाई परिसरातील भूजल पातळी वाढली असून, या परिसरात सध्या अवघ्या २५ फुटांवर बोरवेलला पाणी लागत आहे.
या परिसरात उन्हाळ्यामध्ये पाण्याची गंभीर समस्या जाणवते. या परिसरातील नागरिकांना मे महिन्यात ३५० ते ४०० फूट खोल बोअरवेल घ्यावी लागत होती. यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे भूजल पातळी वाढली आहे. त्यामुळे बोअरवेलला २५ फुटापर्यंत लागत आहे. त्यामुळे अनेक नागरिक सध्या २५० फुटांपर्यंत बोअरवेल घेत आहेत. दुसरीकडे, सातारा-देवळाई परिसरात यंदा जुलैपासूनच टँकरच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत.
पुनर्भरणाचे महत्त्व कळले
परिसरात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम राबविण्यात आली. परिसरातील मोठ्या घरांच्या छतावरील पावसाचे पाणी वाहून जावू नये म्हणून ते बोअरवेलमध्ये अडविले जात आहे. सातारा-देवळाईतील नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटलेले आहे. त्यामुळे टँकरच्या फेऱ्या कमी झालेल्या आहेत.
- अशोकराव तिनगोटे
२५ फुटापासूनच पाणी
बोअरवेल घेताना शंभर ते दीडदोनशे फुटांपर्यंत फक्त धुराळा उडत होता. आता अवघ्या २५ फुटांवर पाणी लागत आहे. याचाच अर्थ पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली आहे.
- सादीक पटेल, बोअरवेल चालक.
पाणी जपूनच वापरा
या परिसराला १२ महिने टँकरमुक्ती नाही, असा नागरिकांमध्ये तर्क काढला जातो. यंदा गतवर्षीच्या तुलनेत पावसामुळे पाणीपातळी भरमसाठ वाढलेली आहे. त्या पाण्याचा गैरवापर टाळावा. भविष्यात सर्वांसाठी ते फायद्याचे राहील.
- डॉ. प्रशांत अवसरमल
आकडेवारी घेणे सुरू
पावसाचे प्रमाण चांगले असल्याने शहरात भूजल पातळीत वाढ झालेली आहे. सातारा-देवळाईच्या बाजूला डोंगर असल्याचा फायदा आहे. चार महिन्याला पाणीपातळीची नोंद घेतली जाते. महिनाअखेर विभागाच्या निरीक्षणातून पाणीपातळीचे आकडे समोर येतील.
- बी. एस. मेश्राम, (उप-संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा औरंगाबाद विभाग.)