औरंगाबाद : सिडको परिसरातील मनपाच्या प्रियदर्शिनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारण्यात येत आहे. ते काम सुरू असताना खोदकामावेळी सापडलेली १६८९ ब्रिटिशकालीन नाणी ( British Era Coins Found In Aurangabad ) नसून ती टोकन असल्याचे प्राथमिक मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हा दुर्मिळ ठेवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackarey ) यांनी पाहण्याची इच्छा व्यक्त केली असून येत्या दोन दिवसात प्रशासनाचे अधिकारी नाणीवजा टोकन घेऊन मुंबईला जाणार आहेत.
ती नाणी स्मारकाच्या नियोजित जागेत आढळली. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ती नाणी पाहण्याची इच्छा व्यक्त केली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह अप्पर तहसीलदार, राज्य पुरातत्त्व विभागाचे अधिकारी मुंबईला रवाना होणार आहेत. त्यानंतर ही नाणी राज्य पुरातत्त्व विभागाच्या संचालकांकडे सुपूर्द केली जाणार आहेत. ती नाणी नसून ब्रिटिशकालीन टोकन असल्याचा प्राथमिक अंदाज गुरुवारी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रियदर्शिनी उद्यानात ठाकरे स्मारक उभारले जाणार आहे. या परिसरात उद्यानाच्या सुरक्षा भिंतीच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी मजुराला एका पिशवीमध्ये अतिदुर्मिळ ब्रिटिशकालीन नाणी सापडली. या नाण्यांवर सोन्याचे पॉलिश असून ते ब्रिटिशकालीन असल्याचे त्यावर कोरलेल्या अक्षरावरून स्पष्ट झाले.
महसूल विभागाने पोलीस बंदोबस्तात पंचनामा करून ती नाणी ताब्यात घेतली. त्याची तज्ज्ञांकडून तपासणी करून गुरुवारी कोषागारात जमा केल्याचे अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले. पुरातत्व विभागाचे सहायक अभिरक्षक अमृत पाटील हे गुरुवारी अप्पर तहसील कार्यालयात आले होते. त्यांनी पाहणी केल्यानंतर सापडलेले नाणी नसून ब्रिटिशकालीन टोकन असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला.