छत्रपती संभाजीनगर : घटस्थापनेसह गुरुवारपासून शहरात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या रासदांडियासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. नऊ दिवस शहरात ९१ अधिकाऱ्यांसह १४४३ अंमलदार बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडतील. दांडिया दरम्यान छेडछाडीच्या घटना टाळण्यासाठी ३४ महिला, पुरुष अंमलदारांचे १७ पथक स्थापन करण्यात आले आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून शून्य गुन्ह्यासह शहरात नवरात्र उत्सव निर्विघ्न पार पडत आहेत. कर्णपुऱ्याच्या यात्रेसह शहरात विविध ठिकाणी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. गणेशोत्सवाप्रमाणेच पोलिसांनी विविध मंडळाशी संपर्क साधून गर्दीचा अहवाल घेतला. कर्णपुरा यात्रेत यंदा १० लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
- एकूण ४१५ सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांकडून देवीची स्थापनेचा अंदाज.- बुधवारपर्यंत ६ मोठ्या रासदांडियांना परवानगी. हा आकडा १२ पर्यंत जाईल. ८८ वसाहतीत दांडियांचे आयोजन.-१ एसआरपीएफ कंपनीसह ५०० होमगार्ड पोलिसांच्या मदतीला तैनात असतील.- कर्णपुरा यात्रेवर पाच ड्रोनद्वारे सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.
शहरातील प्रमुख उत्सवकर्णपुऱ्यासह केसरसिंगपुऱ्यातील रेणुका माता मंदिर, हर्सुल येथील हरसिद्धी देवी मंदिर, जळगाव रोडवरील रेणुका माता मंदिर, दौलताबाद येथील भांगसिमाता गड, साताऱ्यातील रेणुकामाता मंदिर, वाळुजमधील रेणुकामाता मंदिर मुर्शिदाबाद (भगतवाडी) या ठिकाणी यात्रा भरून भाविकांची मोठी गर्दी होते.
शेवटचे २ दिवस १२ वाजेपर्यंत परवानगीपोलिसांच्या माहितीनुसार, ध्वनीक्षेपकाची परवानगी ११ व १२ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत देण्यात आली आहे. अन्य दिवशी रात्री १० वाजताच रासदांडियाचा आवाज बंद होईल.
दांडियादरम्यान पोलिसांची गस्तदांडियादरम्यान, तसेच संपल्यानंतर घरी परतताना टवाळखोरांना आवर घालण्यासाठी मार्गांवर काळजीपूर्वक गस्त घालण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. छेडछाड विरोधी पथका व्यतिरिक्त १ सहायक फौजदार, २ अंमलदार चारचाकीतून, तर ३२ दुचाकींवरून अंमलदार गस्त घालतील.