- सुनील घोडकेखुलताबाद: राष्ट्रसंत परमपूज्य मोरारी बापू यांनी बुधवारी सायंकाळी पळसवाडी येथील एका शेतात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी जावून भिक्षा मागितली. चक्क बापू घरी आल्याचे पाहून शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या आनंदाला उधाण आले.
वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या आश्रमात राष्ट्रसंत परमपूज्य मोरारी बापू यांची ७ ते १५ सप्टेंबर दरम्यान नऊ दिवशीय श्रीराम कथा सुरू आहे. या कथेसाठी देशभरातून जवळपास १० हजार भाविक वेरूळनगरीत आले आहेत.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गवरील पळसवाडी येथील शेतकरी कल्याण औटे यांच्या शेतातील घरी भिक्षेसाठी स्वतः राष्ट्रसंत मोरारी बापू आले. परमपूज्य बापूंना दारात पाहून शेतकरी कुंटूबियास मोठा आनंद झाला. बापू यांनी शेतकऱ्याने दिलेल्या दोन भाकरी आपल्या वाटीत घेतल्या. तसेच शेतकऱ्याने मोठ्या आपुलकीने भाजून दिलेल्या कणीसाचा स्वीकार देखील बापू यांनी केला. बापू यांच्या आगमनाची माहिती होताच परिसरातील शेतकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली.
यावेळी बापू यांनी शेतकरी कुंटूबातील महिलांना वस्रदान केले. तसेच बापू यांच्या हस्ते शेतकऱ्याच्या अंगणात बेलवृक्षाचे रोपण केले. त्यानंतर शेतकरी कुटुंबायाची आस्थेवाईकपणे चौकशी करून परमपूज्य बापू यांनी निरोप घेतला.