- रऊफ शेखफुलंब्री : जालना जिल्ह्यातील अंतरवली येथील मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवरील लाठीचार्ज व गोळीबाराचा निषेध करत आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चेच्यावतीने आज ( दि. ९ ) सकाळी 11 वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर दोन ठिकाणी रास्तारोको आंदोलन केले.
चौका व पाल फाटा येथे रास्तारोको आंदोलन सुरु असल्याने या महार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे, पाल फाटा येथे आंदोलनात रामेश्वर काकडे महाराज याचे कीर्तन सुरू आहे. रस्त्यावर बसून आंदोलकांनी कीर्तनात सहभाग घेतला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे आंदोलकांवरील लाठीचार्ज व गोळीबाराचा निषेध करत आंदोलकांनी संबधित पोलीस अधीक्षकास सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली. तसेच मराठा आरक्षण मिळेपर्यंत प्रत्येक गावामध्ये आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच अनेक आंदोलकांनी यावेळी मुंडण करून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला.