बीड : तालुक्यातील खापरपांगरी हे गाव दूध उत्पादनासाठी प्रसिध्द. परिसरातील इतर गावांचे अर्थकारणही दुग्ध व्यवसायावर अवलंबून. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे दुग्ध व्यवसाय पूर्णपणे धोक्यात आला होता. अशाही परिस्थितीत छावणीने गुरांना तर आश्रय दिला सोबतच दुग्ध व्यवसाय टिकवला. आजघडीला येथून अडीच हजार लिटर दुधाचा रतीब घालण्यात येत आहे.ओंकार सेवाभावी संस्थेच्या वतीने खापरपांगरीत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक हिंगे यांनी छावणी सुरू केली आहे. सुरूवातीला गुरांची संख्या कमी होती. मात्र, दुष्काळी झळा जसजशा तीव्र होत आहेत तसतशी गुरांची संख्या वाढू लागली आहे. सध्या ९०० वर गुरे छावणीच्या आश्रयाला आहेत. परिसरातील १५ ते २० गावातील गुरे छावणीत जगत आहेत. यामध्ये गायी-म्हशींची संख्या सर्वाधिक आहे. ओला-सुका चारा, पशुखाद्य, दावणीला पाणी असल्याने जनावरांची सोय झाली आहे. अडीच हजाराहून अधिक लिटर दूध निर्मिती होते. बीड शहर चिकटून असल्याने छावणीतील दुधाचा पैसा उभा करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. गणेशोत्सवात छावणी संचालकांनी मिष्ठान्नाची पंगत दिली. प्रबोधनात्मक कार्यक्रमातून खचलेल्या शेतकऱ्यांचे आत्मबल वाढतेय. (प्रतिनिधी)
छावणीतून अडीच हजार लिटर दुधाचा रतीब
By admin | Published: October 26, 2015 11:53 PM