छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अप्रत्यक्षरीत्या सरकारची कानटोचणी तर केलीच, शिवाय विरोधकांनाही कानपिचक्या दिल्या. राम आणि रावण यांची उदाहरणे देत अहंकारामुळे रावणाचा नाश झाल्याची आठवण करून दिली.
गुरुवारी सायंकाळी स्व. दत्ताजी भाले स्मृती समितीने उभारलेल्या रा.स्व. संघाच्या ‘समर्पण’ कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बाेलत होते. व्यासपीठावर संघाचे प्रांत संघचालक अनिल भालेराव व स्व. दत्ताजी भाले स्मृती समितीचे अध्यक्ष देवानंद कोटगिरे यांची उपस्थिती होती.
डॉ. भागवत म्हणाले, रावण व राम दोघे जण ज्ञानी होते. मात्र, रावणात प्रचंड अहंकार होता. ज्ञानी असूनही अहंकारामुळे रावण हरला. आता चांगल्या परिवर्तनाची वेळ आली आहे. जगाचे लक्ष आपल्या तत्त्वज्ञान व संस्कृतीवर गेले आहे. आपला राष्ट्रीय पुरुषार्थ वाढला आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. विनातपस्या असे कार्य होत नाही. या पाठीमागे निस्पृह कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज असते. त्यांच्या तपस्येचे फळ आज दिसत आहे. राजकारणात जो पुढे जातो त्यावर जळणारे अनेक जण निर्माण होतात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
समर्पण इमारत उभी करण्यात अनेकांचे योगदान आहे. आधी संघाचे कार्यकर्ते किंवा स्वयंसेवक अशा मोठ्या निर्मित झालेल्या वास्तूंमध्ये कार्यालयांमध्ये राहत नव्हते. हितचिंतकांच्या घरी स्वयंसेवक, संघप्रचारक राहत असत. याचीही जाणीव ठेवण्याचे काम तुम्ही करा असे स्पष्टपणे अधोरेखित केले. संघ, त्यातील समर्पण आणि एकूण कार्य हे व्यापक आहे, त्यातून जग आपल्याकडे पाहत आहे. हे केवळ दोघा तिघांचे काम नाही तर विश्वगुरू होताना सर्मपणाचा भावदेखील जगासमोर ठेवला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
श्रीराम मंदिरासाठी ५०० वर्षांचा संघर्ष...२२ जानेवारीला सर्व देशाने अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अनुभवला, त्याचा आनंदोत्सव साजरा केला; पण हे कार्य काही एकारात्रीतून घडले नाही. यापाठीमागे ५०० वर्षांचा संघर्ष होता. गेल्या ३० वर्षांत उभे राहिलेले मोठे आंदोलन होते. त्यासाठी अनेकांचे बलिदान तपश्चर्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
७७ टक्के लोकांना स्वातंत्र्यलढा, आणीबाणीचा गंध नाहीदेशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी असंख्य लोकांनी बलिदान दिले, घरसंसाराचा त्याग केला. मात्र, आजच्या ७७ टक्के लोकांना नवपिढीला स्वातंत्र्यलढा व आणीबाणी यांची महती माहीतच नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा चारित्र्य, इतिहास आवर्जून वाचावा, हे मोहन भागवतांनी एका गोष्टीच्या माध्यमातून सर्वांना सांगितले.