- जयंत कुलकर्णी
औरंगाबाद : खोलच खोल दऱ्या, लांबच लांब घाट, अरुंद मार्ग, उणे तापमान, अत्यंत कमी प्राणवायू अशी प्रतिकूल परिस्थिती आणि त्यातच मधुमेहाचा त्रास आणि याआधी आलेल्या हार्टअटॅकनंतरही औरंगाबादच्या डॉक्टरांनी लेहलडाख क्षमतेची परीक्षा घेणारी मोहीम यशस्वीपणे फत्ते केली. १६ दिवसांत ६ हजार ५00 कि. मी. अंतराची ही मोहीम फत्ते केल्यानंतर हे डॉक्टर औरंगाबादेत नुकतेच परतले.
औरंगाबाद येथील डॉ. रवींद्र पांडे आणि देवगाव रंगारीचे डॉ. प्रशांत पवार यांच्यासह अहमदनगरचे डॉ. रवींद्र शेजूळ व डॉ. शिवराज घोरपडे या चार डॉक्टरांनी २८ मे रोजी सकाळी ६ वाजता मोटारसायकलवर लेहलडाख मोहिमेस सुरुवात केली. या मोहिमेत सहभागी होणा-या ६१ वर्षीय डॉ. प्रशांत पवार यांना काही वर्षांपूर्वीच हार्टअटॅक आलेला आणि ५५ वर्षीय रवींद्र पांडे यांना मधुमेहाचा त्रास आहे. आपल्या या थरारक मोहिमेविषयी डॉ. रवींद्र पांडे यांनी ‘लोकमत’शी आपला अनुभव कथन केला.
पांडे म्हणाले, ‘‘आम्ही सर्व जण मिळून देवगाव रंगारी येथून या मोहिमेस सुरुवात केली. देवगाव रंगारी ते श्रीनगर हे अंतरापर्यंत आम्हाला फारशी अडचण आली नाही. या मार्गादरम्यान आणि दररोज ५०० ते ६०० कि. मी. प्रतिदिन ७० ते ८० कि.मी. प्रति तास मोटारसायकल चालवली. मात्र, खºया थरारकतेला सुरुवात ही श्रीनगरहून लेहलडाखकडे मार्गक्रमण करताना झाली. द्रास कारगिल, रोहतांग पास, मॅग्नेटिक हिल, झीरो पॉइंट असा प्रवास आम्ही केला. श्रीनगरहून जाताना जलाघाटवरून जावे लागले. या घाटाचा चढ १३ हजार फूट असा होता. त्यातच आजूबाजूला डोंगर आणि बर्फाच्या पाण्याने निर्माण झालेल्या नद्यातून आम्हाला मार्ग काढावा लागला. या नद्यांतून मार्ग काढत चालवताना अर्धी मोटारसायकल पाण्यात असायची आणि त्यातच मोठ-मोठाले दगड. श्रीनगर ते लेहलडाख मार्गात खोलच खोल द-या होत्या आणि एका बाजूला डोंगर. या घाटातील रस्ता अरुंद असल्यामुळे एकच गाडी जायची. मिल्ट्रीची मोठी गाडी आली की, आम्हाला थांबावे लागायचे.
खांर्दुंगला पास हे १८ हजार ३८० फूट उंचीवर होते. १३ हजार ५८ फूट उंचीवर असणा-या रोहतांग पास येथे तर उणे ९ टेम्परेचर होते. तेथे प्राणवायू कमी असायचा. उणे तापमान असल्यामुळे गाड्याही चालायच्या नाही. ताशी १० कि.मी. अशा वेगाने आम्हाला गाडी चालवावी लागली. या मोहिमेदरम्यान आम्ही कारगिल म्युझिअमलाही भेट देली. तसेच लेहमधील आर्मीचे म्युझियमही आम्ही पाहिले.’’ या मोहिमेविषयी ते म्हणाले, ‘‘मी आणि डॉ. पवार हे आम्ही आधी रोडरेसमध्ये सहभागी व्हायचो. भारतभ्रमण करण्याचे आमचे स्वप्न आहे. त्यानुसार पहिला टप्पा म्हणून लेहलेहलडाख या मोहिमेवर जाण्याचा निर्धार केला. ’’दोनदा हार्टअटॅक, पाच वेळा पॅरालिसिसचा अटॅक तरीही गाठले लक्ष्य...
ही मोहीम यशस्वीपणे फत्ते करणारे डॉ. प्रशांत पवार यांना वयाच्या २५ आणि ४५ व्या वर्षी असा दोनदा हार्टअटॅक आला आहे, तसेच आतापर्यंत ५ वेळेस पॅरालिलिसिसचा अटॅक आला. असे असतानाही वयाच्या ६१ व्या वर्षी फक्त रायडिंगचा छंद जोपासत डॉ. प्रशांत पवार यांनी प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्दीद्वारे कठीण असणारी ही मोहीम फत्ते केली. पवार यांनी आतापर्यंत १५ ते १६ मोटारसायकल रेस जिंकल्या आहेत. त्यात बंगळुरू रॅली, देवगिरी रॅली, कर्नाटक रॅली आदींचा समावेश आहे.
आपला अनुभव कथन करताना ते म्हणाले, लेहला जाताना जोजिला पास हा २५ ती ते ३0 कि. मी.चा घाट आहे. तेथे अचानक दरड कोसळतात. प्रचंड धूळ आणि मोठमोठे खडक असतात, त्यातून तुम्हाला मार्ग काढावा लागतो. आजूबाजूला उंचच उंच डोंगर, नदी आणि वाळवंटही आम्हाला पाहायला मिळाले. टायगर हिल पाहण्याची संधीही आम्हाला मिळाली, असे पवार यांनी सांगितले. खांर्दुंगला पास हे भारतातील सर्वात उंचीवर असणारे खेडे आहे. तेथे कमी आॅक्सीजन असल्याने फक्त मिल्ट्रीतील सैनिक आणि मेंढपाळच असतात. दोन डोंगराच्या मधात नुंब्रा व्हॅली आहे. दोन डोंगरातील वाहणा-या पाण्यातून नदी निर्माण झाली आहे. तरीदेखील तेथे वाळवंट असल्याचे सांगितले. तसेच रोहतांग पास येथे तळे असून तेथे खारट पण स्वच्छ पाणी असल्याची माहिती त्यांनी दिली.