वाळूज महानगर : नवीन वेतनवाढीचा करार करण्यास कंपनी व्यवस्थापनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे वाळूज एमआयडीसीतील रेमंड कंज्युमर केअर कंपनीच्या कामगार एक महिन्यापासून काळ्या फिती लावून काम करीत आहेत.
वाळूज उद्योगनगरीतील रेमंड कंज्युमर केअर या कंपनीत कंडोमचे उत्पादन केले जाते. कंपनीत १९४ महिला व पुरुष काम करतात. कामगारांचा जुना वेतन वाढीचा करार गतवर्षी जूनमध्ये संपला आहे. मात्र अद्याप नवीन वेतनवाढीचा करार करण्यात आला नाही. नवीन वेतनवाढीचा करार करण्यात यावा, या मागणीसाठी कामगरांनी संघटनेमार्फत कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला. महिनाभरापासून कामगार काळ्या फिती लावून काम करीत आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु असूनही व्यवस्थापन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप कंपनीतील कामगार संघटनेच्या अध्यक्षा वनिता देशमुख, उपाध्यक्षा अर्चना बोर्डे, सचिव प्रकाश नरवडे, गणेश जाधव, रमेश गावंडे, विश्वनाथ वाघमारे, सतिश कुलकर्णी, शांताराम बनसोडे, अनिल पवार आदी कामगारांनी केला आहे.
कंपनीचे एचआर विभागाचे मंगेश देव म्हणाले की, वेतनवाढीसंदर्भात कामगारांशी चर्चा सुरु आहे. यासंदर्भात १८ मे रोजी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र कामगाराकडून अडवणुकीचे धोरण अवलंबिले जात आहे, असे त्यांनी सांगितले.