औरंगाबाद : टिळकनगर भागातील रवींद्रनगर हाऊसिंग सोसायटीमधील खुली जागा महापालिकेने सोमवारी ताब्यात घेतली. मात्र, मागील सोळा वर्षांपासून जागेवर दावा करणाऱ्या विकासकांनी रात्रीतून पुन्हा अतिक्रमण केले. मंगळवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बिल्डरने उभारलेले शेड निष्कासित केले.
रवींद्रनगर हाऊसिंग सोसायटीने ले आउटमधील खुली जागा महापालिकेला हस्तांतरित केली होती. जागेच्या मूळ मालकाने नंतर एका विकासकाला जीपीए करून दिला होता. गत सोळा वर्षांपासून या जागेचा वाद न्यायालय व शासन दरबारीसुद्धा पोहोचला होता. न्यायालयाचे सर्व अडथळे दूर झाल्यानंतर सोमवारी महापालिकेच्या नगररचना, मालमत्ता आणि अतिक्रमण हटाव विभागाने मिळून संयुक्त कारवाई करीत जागेवरील अतिक्रमण हटविले होते. या कारवाईनंतर महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना ३० कोटी रुपयांच्या जागेवर त्वरित तारेचे कुंपण लावावेत, असे आदेश दिले होते. काम सुरू करण्यास पालिकेकडून विलंब झाला. ही संधी साधत रात्रीतून जमिनीवर दावा करणाऱ्या विकासकाने वाचण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले. सकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळाल्यानंतर पुन्हा फाैजफाटा तेथे दाखल झाला. पत्र्याचे शेड हटवून महापालिकेने तारेचे कुंपण लावण्याचे काम सुरू केले. भविष्यात या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिकेकडून विशेष काळजी घेण्यात येणार आहे. खुल्या जागेवर चारही बाजूने वृक्षारोपण करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे.