लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : केळगाव येथील मयत ग्रा.पं. शिपाई विठ्ठल वाघ यांचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येईल. त्याबरोबर उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून ८ दिवसांत दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी शिष्टमंडळाला दिले, अशी माहिती अण्णाभाऊ साठे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन साबळे यांनी ‘लोकमत’ला दिली.केळगाव येथे ग्रा.पं. शिपाई विठ्ठल वाघ यांचा रविवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाला होता. यानंतर वाघ यांच्या कुटुंबियांनी येथील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांनी मारहाण करून खून केल्याचा आरोप करीत ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला होता. पोलीस अधीक्षकांसह अन्य वरिष्ठ अधिकाºयांनी भेट देऊन कुटुबियांची समजूत काढली. मात्र, तरीही कुटुंबियांनी मागणी कायम ठेवली. त्यामुळे चार दिवसांपासून वाघ यांचे पार्थिव सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात पडून आहे.बुधवारी एका शिष्टमंडळाने विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली असता वरीलप्रमाणे आश्वासन दिले. यावेळी डॉ. सचिन साबळे, संजय ठोकळ, प्रा. रामचंद्र भरांडे, अनिल साबळे, सतीश सेलार, सीताराम कांबळे, बबनराव शेलार, अॅड. सुनील नाडे, नानासाहेब गायकवाड, जया राजकुंडल, प्रा. बी.आर. बावस्कर आदींची उपस्थिती होती.
‘त्या’ ग्रा.पं. शिपायाचे पुन्हा शवविच्छेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:13 AM