कार्य करतेय, घाबरून जाण्याची गरज नाही
फिजिशियन्स असोसिएशन : जनजागृती करण्यावर देणार भर
औरंगाबाद : कोणत्याही लसीकरणानंतर शरीरात रिॲक्शन होत असते. कोणाला तत्काळ रिॲक्शन होते, तर कोणाला उशिरा. मुळात हे रिॲक्शन, साईड इफेक्ट नसतात, शरीरातील प्रतिकारशक्ती कार्य करतेय, याचे लक्षण असते, असे फिजिशियन्स असोसिएशनच्या शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटणे म्हणाले.
जिल्ह्यात सध्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. लसीकरणानंतर काहींना मायनर रिॲक्शन होत आहे. या रिॲक्शनविषयी संजय पाटणे यांनी फिजिशियन्स असोसिएशनची भूमिका स्पष्ट केली. काही वरिष्ठ फिजिशियन्सनेदेखील लस घेतली आहे. यात केवळ एकास सर्दीसदृश त्रास झाला. इतरांना कोणताही त्रास झाला नाही. लस ही सुरक्षितच आहे. त्याविषयी अवास्तव भीती बाळगण्याची गरज नाही. कारण ती फेज थ्री ट्रायल म्हणजे मनुष्यावर चाचणी झाल्यानंतरच उपलब्ध झालेली आहे. शिवाय लसीकरणानंतर आतापर्यंत कोणालाही गंभीर स्वरूपात काही झालेले समोर आलेले नाही. त्यामुळे लसीकरणाविषयी भीती बागळण्याची, गैरसमज करून घेण्याची गरज नाही. त्याविषयी असोसिएशन जनजागृती करणार असल्याचे डॉ. संजय पाटणे म्हणाले.
रिॲक्शन नव्हे, शरीरातील ‘इव्हेंट’
लसीकरणानंतर किरकोळ स्वरूपात काहींना त्रास होणे, हे वाईट नाही. त्याला रिॲक्शन, साईड इफेक्टही म्हणता येत नाही, तर हा शरीरातील एक इव्हेंट म्हणजे घटना असते. लस देणे म्हणजे शरीरातील प्रतिकारशक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे लसीकरणानंतर शरीर रिॲक्ट करते, असे डॉ. संजय पाटणे म्हणाले.