सिल्लोड : सिल्लोड येथे नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या आंदोलनातील सहआरोपी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सिल्लोड तालुका न्यायालयाने सोमवारी वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला. ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन एका शिवसैनिकाने केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी नेत्याकडेच पाठ फिरवली. राज ठाकरे यांचा जामीन शिवसैनिकाच्या वडिलांनी घेतल्याने सिल्लोड शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या आंदोलनातील राज ठाकरे सहआरोपी होते. त्यांना सिल्लोड न्यायालयाने या प्रकरणात वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट रद्द करणे व जामीन घेण्यासाठी सिल्लोड न्यायालयात ठाकरे यांनी सोमवारी हजेरी लावली. न्या. केपीआरएस राठौर यांनी त्यांना १०, तर दुसऱ्या न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. केस नंबर ५०५/२००८ मध्ये न्या. केपीआरएस राठौर यांनी १० हजारांच्या जातमुचलक्यावर ठाकरे यांना जामीन दिला. केस क्रमांक ४९८ /२००८ मध्ये सहदिवाणी न्यायाधीश देशमुख यांनी त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. शिवसैनिकाचे वडील एकनाथ दाभाडे यांनी राज ठाकरे यांचा जामीन घेतला. भोकरदन व सिल्लोड येथे सोमवारी न्यायालयात हजर राहण्यासाठी राज ठाकरे येणार असल्याची माहिती मिळताच तालुक्यातील शेकडो नागरिकांनी सिल्लोड न्यायालयात गर्दी केली होती. यावेळी सिल्लोड पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.२१ नोव्हेंबर २००८ रोजी राज ठाकरे यांना रत्नागिरीमध्ये पोलिसांनी अटक केली होती. यावेळी राज्यात मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले. यात सिल्लोड शहरात यशवंत कॉलेज व भराडी रोडवर ९ एसटी बसेसची तोडफोड झाली होती. राज ठाकरे यांच्यासह सिल्लोड शहरात ५, तर ग्रमीण भागातील ४ अशा ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांना सिल्लोड येथील दोन्ही न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट रद्द करणे व जामीन मिळवण्यासाठी राज ठाकरे सिल्लोड येथे न्यायालयात सोमवारी हजर झाले. २० ते २६ एप्रिलपर्यंत ठाकरे न्यायालयात वॉरंट रद्द करणे व जामिनासाठी ठिकठिकाणच्या न्यायालयात हजर राहत आहेत. या सहा दिवसांत त्यांनी आतापर्यंत २४ न्यायालयांत जामीन मिळवला आहे. राज ठाकरे यांच्याकडून माजी आमदार अॅड.जयप्रकाश बावस्कर मुंबई, अॅड. राजेंद्र शिरोडकर, अॅड. सयाजी नागरे, अॅड. धनंजय जैवळ, विलास महाजन यांनी काम पाहिले.आश्रमशाळेचे उद््घाटन फुलंब्री : गिरसावळी येथे सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते स्व़ श्रीकांत ठाकरे निवासी आश्रमशाळेचे उद्घाटन झाले़ यावेळी भास्कर गाडेकर, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, काशीगिरी महाराज, अनिल शिदोरे, जयप्रकाश बाविस्कर, राजेंद्र शिरोडकर, मनोज हाटे, हर्षल देशपांडे उपस्थित होते़
मनसे कार्यकर्त्यांची पक्ष नेत्याकडे पाठ
By admin | Published: April 25, 2016 11:35 PM