औरंगाबाद : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. शाळांमध्ये तर या दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिनानिमित्त केलेल्या सर्वेक्षणानुसार वाचन संस्कृती केवळ विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर एकं दरीत शिक्षकवृंदामध्ये आणि समाजामध्येच कमी झाल्याचे दिसून येते.
२०१५ पासून हा दिवस साजरा केला जातो. १५ ते २२ आॅक्टोबर हा कालावधी वाचन प्रेरणा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. डॉ. कलाम यांच्या पुस्तकांसोबतच इतर लेखकांची प्रेरणादायी पुस्तके शाळांमधून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी आणि विद्यार्थ्यांनीही या पुस्तकांचे वाचन करावे, असे या दिनानिमित्त अपेक्षित आहे.
वाचन पे्ररणा दिनानिमित्त डॉ. अब्दुल कलाम यांच्याच साहित्याविषयी ‘लोकमत’ने शिक्षण आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण केले. यामध्ये डॉ. अब्दुल कलाम यांची कोणती पुस्तके आपल्याला माहीत आहेत, याविषयी विचारले असता ९५ टक्के लोकांनी अग्निपंख या एकाच पुस्तकाचे नाव सांगितले. केवळ पाच टक्के लोकांना त्यांच्या इतर पुस्तकांची नावे सांगता आली. अग्निपंख हे पुस्तक आपण वाचले आहे का? या प्रश्नाचे उत्तर ६० टक्के लोकांनी हो असे दिले. ८० टक्के लोकांना अग्निपंखव्यतिरिक्त डॉ. कलाम यांची इतरही अनेक पुस्तके आहेत, हे माहीत नाही. व्हॉटस्अॅप, फेसबुक किंवा सोशल मीडियावर शेअर केले जाणारे लेख आपण आवर्जून वाचतो. पण पुस्तक विकत घेऊन किंवा गं्रथालयातून आणून किंवा इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या अॅपवरून डाऊनलोड करून खूप दिवसात वाचले नसल्याचे अनेक तरुणांनी सांगितले.
सादिलवार खर्च बंद झाल्याने अडचणपूर्वी शाळांना सादिलवार खर्च दिला जायचा. या खर्चातून शाळेत पुस्तकांची खरेदी के ली जायची. पण आता हा खर्च देणे बंद केल्यामुळे अनेक शाळांसाठी अभ्यासक्रमासंबंधी पुस्तके घेण्याचीच वानवा असताना अवांतर वाचनाची पुस्तके घेणे फार दूरची गोष्ट झाली आहे. यामुळेही विद्यार्थी आणि ग्रंथालयांचे अंतर शालेय जीवनापासूनच वाढू लागले असल्याची खंत काही साहित्यिकांनी व्यक्त केली.
वाचन टिकले तर संस्कृती टिकेल
केवळ विद्यार्थीच नव्हेतर एकंदरीत सर्वच समाजाचे वाचन कमी झाले आहे. आमच्या पिढीला शालेय जीवनापासून कथा, कादंबऱ्या वाचायची सवय होती, पण आता तर महाविद्यालयातील विद्यार्थीच काय, पण प्राध्यापकांनीही या कादंबऱ्यांचे वाचन केलेले नाही. मातृदिन, पितृदिन आणि आता वाचन पे्ररणा दिन, असे एक दिवसापुरते आपण सगळे मर्यादित करून टाक ले आहे. पण या दिनानिमित्त अंतर्मुख होऊन पाच टक्के लोकांना जरी वाचनाची प्रेरणा मिळाली तरी समाजात वाचन संस्कृती पुन्हा एकदा रुजू होऊ शकेल आणि वाचन टिकले तरच संस्कृती टिकेल.- प्रतापराव बोराडे, प्राचार्य