औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शहराशी अतूट नाते होते. हे नाते अधिक मजबूत करण्यासाठी मी आलोय. पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे शिष्य श्रीखंड्या यांनी आपल्या कावडमधून पाणी आणून पाण्याचा हौद भरला होता. औरंगाबाद शहरातील लाखो नागरिकांची तहान भागविण्यासाठी मी श्रीखंड्या होण्यासही तयार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
गरवारे क्रीडा संकुलावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्वात मोठ्या १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. १७४ कोटींचे सफारी पार्क, १५२ कोटींच्या रस्त्यांची कामे, २५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजन सुद्धा रिमोट दाबून करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांची ओळख रिमोट कंट्रोल अशी होती. आज स्मारकासह विविध विकास कामांचे भूमिपूजन सुद्धा रिमोट दाबून करण्यात आले. हा एक योगायोगच म्हणावा लागेल. लवकरच गुळगुळीत रस्ते औरंगाबादकरांना मिळतील. शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम बघण्यासाठी मी न सांगता येईल. समृद्धी महामार्गाचे काम हे अचानक पद्धतीने बघितले. कितीही केले तर मी औरंगाबादकरांचे ऋण फेडू शकत नाही असेही शेवटी त्यांनी सांगितले. कार्यक्रमास आ. संजय शिरसाट, अंबादास दानवे, हरिभाऊ बागडे, सतीश चव्हाण, प्रदीप जयस्वाल, अतुल सावे, विनोद घोसाळकर, मिलिंद नार्वेकर, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर तर आभार अंबादास दानवे यांनी मानले.