दर महिन्याला ''थ्री इडियट्स''चा प्रसंग : गुंतागुंतीच्या प्रसूती सिझेरियनशिवाय यशस्वी करण्याची किमया
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : ‘थ्री इडियट्स’ चित्रपट सर्वांना आठवत असेल. त्यातील ''रँचो'' म्हणजे अभिनेता आमिर खानची भूमिकाही लक्षात असेल. चित्रपटात या रँचोने व्हॅक्युम क्लिनरच्या मदतीने अभिनेत्रीच्या बहिणीची प्रसूती केली होती. अशा गुंतागुंतीच्या प्रसूती केवळ चित्रपटांपुरत्याच मर्यादित नाहीत, तर प्रत्यक्षात होतात. दचकलात? औरंगाबादेत वर्षभरात एक-दोन नव्हे, ''व्हॅक्युम''ने तब्बल ३२५ प्रसूती झाल्या आहेत. या प्रसूती करणारे रँचो म्हणजे घाटी रुग्णालयातील डॉक्टर्स.
मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांचा आधारवड घाटी रुग्णालयात वर्ष २०२० मध्ये अशा गुंतागुंतीच्या ३२५ प्रसूती झाल्या आहेत. गुंतागुंतीच्या प्रसूती सिझेरियनशिवाय व्हॅक्युमच्या मदतीने येथील डॉक्टरांनी यशस्वी केल्या आहेत. त्यामुळे घाटीतील डॉक्टर एकप्रकारे खरे रँचो आहेत. घाटीत वर्षाला १४ हजार ते १८ हजार प्रसूती होतात. वर्षभर म्हणजे प्रत्येक महिन्याला १८ ते ४४ अशाप्रकारच्या प्रसूती येथील डॉक्टर करतात. या प्रकारच्या प्रसूतीला वैद्यकीय क्षेत्रात इस्ट्रुमेंटल डिलिव्हरी असे म्हटले जाते.
का केली जाते व्हॅक्युम प्रसूती?
प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर गर्भपिशवीचे तोंड पूर्ण उघडते. बाळाचे डोके खाली सरकते. परंतु नंतर डोके बाहेर यायचे थांबते. अशावेळी सिझेरियन करणे अशक्य होते आणि नैसर्गिक प्रसूतीसाठी वाटही पाहता येत नाही. तेव्हा व्हॅक्युम, चिमटा वापरून प्रसूती केली जाते; पण गर्भपिशवीचे तोंड उघडले नाही तर अशी प्रसूती करता येत नाही.
सिझेरियन टळले, केवळ २ टक्के बाळ ''एनआयसीयू''त
अशाप्रकारची प्रसूती झाल्यानंतर केवळ २ टक्के बाळांना उपचारासाठी ''एनआयसीयू''त दाखल करावे लागले, असे डॉक्टरांनी सांगितले. व्हॅक्युम डिलिव्हरीमुळे सिझेरियन प्रसूती करण्याचे टळते. व्हॅक्युम प्रसूती ही केवळ तज्ज्ञ डॉक्टरच करू शकतात. त्यासाठी प्रशिक्षण घेतले जाते. त्यामुळे माता आणि नवजात बाळ सुरक्षित राहतात, असेही डॉक्टरांनी सांगितले.
तज्ज्ञ डॉक्टरच करतात ही प्रसूती
व्हॅक्युम प्रसूती ही घाटीत अनेक वर्षांपासून होते. गर्भपिशवीचे तोंड पूर्ण उघडते. तेव्हा बाळ बाहेर यायचे थांबते. त्या परिस्थितीत व्हॅक्युम, चिमटा वापरला जातो. वर्षभरात ३२५ प्रसूती झाल्या. अतिशय सतर्कपणे ही प्रसूती करावी लागते. थोडीही चूक आई आणि बाळासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे केवळ तज्ज्ञ डॉक्टरच ही प्रसूती करतात.
- डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग, घाटी
-----
फोटो ओळ
व्हॅक्युम प्रसूतीचे प्रात्यक्षिक करताना घाटी रुग्णालयातील डॉक्टर्स.