रामनगर : जालना तालुक्यातील मोसंबी उत्पादकांनी सन २०१५-१६ साठी भरलेल्या फळपीक विम्याचे जि.म. बँकेतून वाटप सुरू आहे. बहुतांश मोसंबी उत्पादकांना महसूल क्षेत्राचा निकष आडवा आल्याने फळपीक विमा मिळाला नसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.हवामान आधारित फळपीक विमा हंगाम योजना २०१५-१६ मध्ये रामनगर जि.म. बँकेत रामनगर, विरेगाव, नेर आणि पाचनवडगाव या महसूल क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या फळ उत्पादक शेतकऱ्यांनी फळपिकांचे विशेषत: मोसंबीचा पीकविमा हप्ता भरणा केला होता. प्रतिहेक्टरी जवळपास चार हजार रुपयांप्रमाणे उत्पादकांनी पैसे भरले होते. नऊशे सात शेतकऱ्यांनी फळपीक विम्यापोटी २७ लाख रुपये या योजनेत भरणा केले. दुष्काळाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने हे पैसे भरले. २७ लाखाचा भरणा झाला आणि त्याची नुकसान भरपाई फक्त २८ लाख रुपये मिळाली.महसूल क्षेत्राच्या निकषांमुळे अनेक शेतकऱ्यांना फळपीक योजनेचा लाभ मिळाला नसून, महसूल क्षेत्राचा निकष दूर करून सर्वांना फळपीक विमा मिळायला पाहिजे, असे मोसंबी उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव डोंगरे यांनी सांगितले.नेर आणि रामनगर महसूल मंडळातील मोसंबी उत्पादकांना प्रतिहेक्टरी चार हजार रुपये तर पाचनवडगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पंधरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळाली विरेगाव महसूल क्षेत्रास कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. नुकसान भरपाईपोटी प्राप्त २८ लाख रुपयांचे पात्र लाभार्थ्यांना वाटप करणे सुरू असल्याचे बँकेचे शाखाधिकारी सी.बी. खरात यांनी सांगितले. (वार्ताहर)
महसूलच्या निकषांमुळे उत्पादकांचे नुकसान..!
By admin | Published: May 01, 2017 12:02 AM