छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेल्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. मुदत संपण्याच्या एक दिवस अगोदर जिल्ह्यात १९१ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले तर ३७ जणांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रकिया सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दबावतंत्राच्या राजकारणाचे संकेत मिळाले होते. अर्ज नेणाऱ्यांमध्ये महायुती व महाविकास आघाडीतील अनेक जण होते. शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी अर्ज नेल्यामुळे बंडखोरीचा अलर्ट मिळालाच होता. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस मंगळवार आहे.
फुलंब्री मतदारसंघातून भाजपचे प्रदीप पाटील, भाऊसाहेब ताठे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण विरोधात बंड पुकारले. कन्नडमधून संजना जाधव यांनी शिंदे गटात उमेदवारीसाठी प्रवेश केला आहे. तत्पूर्वी संजय गव्हाणे यांनी भाजप म्हणून उमेदवारी दाखल केली तसेच स्वाती कोल्हे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस (अप) कडून अर्ज भरला आहे. सिल्लोडमध्ये सविता घरमोडे यांनी ठाकरे गटातून अर्ज भरला.
पूर्व मतदारसंघातून विठ्ठल जाधव यांनी राष्ट्रवादी (शप) कडून उमेदवारी दाखल करून आघाडी विरोधात दंड थोपटले. पैठणमधून महाविकास आघाडी विरोधात कांचनकुमार चाटे, संजय वाघचौरे उमेदवारी अर्ज भरला. गंगापूरमधून सुरेश सोनवणे यांनी भाजप विरोधात अर्ज दाखल केला तर वैजापूरमधून सचिन वाणी यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराविरोधात अर्ज भरला.
४ नोव्हेंबरला कळेल बंडखोरी की दबावतंत्र..?कन्नड व पैठणवगळता युती व आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत परंतु इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ही बंडखोरी आहे की, दबावतंत्र? हे ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजल्यानंतर स्पष्ट होईल.
मतदारसंघ बदलण्याचा गनिमी कावाशहरातील पूर्व मतदारसंघ आघाडीत काँग्रेसकडे असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अर्ज दाखल केला. पूर्व मतदारसंघातही उद्धवसेना आघाडी उमेदवाराच्या विराेधात २९ रोजी अर्ज भरणार आहे. एमआयएमच्या मध्य व पूर्व मतदारसंघातील उमेदवारांनी अद्याप उमेदवारी दाखल केलेली नाही. सोमवारच्या राजकीय घडामोडी पाहता ऐनवेळी मतदारसंघ बदलण्याचा गनिमी कावा एमआयएम करण्याची चर्चा आहे.
जिल्ह्यात दाखल झालेले उमेदवारी अर्जसिल्लोड- २२कन्नड - १८फुलंब्री - २४औरंगाबाद (मध्य) - १४औरंगाबाद (पश्चिम) - १२औरंगाबाद(पूर्व) - ४१पैठण - ३१गंगापूर - १६वैजापूर -१३