औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत आ. सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलमध्ये बंडखोरी झाली आहे. पदवीधर गटात डॉ. नरेंद्र काळे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज डॉ. संभाजी भोसले यांनी उमेदवारी कायम ठेवली. प्रा. सुनील मगरे यांनी मात्र अर्ज मागे घेतला.
संस्थाचालक गटात माजी उच्चशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या पत्नी मनीषा टोपे यांची बिनविरोध निवड न झाल्यामुळे त्यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. चार जागांसाठी १५ जून रोजी मतदान होईल.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या आठ जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील आरक्षित चार जागा बिनविरोध निघाल्या आहेत. उर्वरित खुल्या गटातील चार जागांमधील दोन जागा बिनविरोध निघण्याची शक्यता होती. मात्र उत्कर्ष पॅनलमध्येच बंडखोरी झाल्यामुळे एकही जागा बिनविरोध निघाली नाही.
संस्थाचालक गटात माजी मंत्री राजेश टोपे यांच्या पत्नीला बिनविरोध निवडून आणण्यासाठी पडद्याआड जोरदार हालचाली झाल्या. मात्र अपक्ष भाऊसाहेब राजळे आणि संजय निंबाळकर यांनी टोपे यांच्या हालचालींना खो घालत अर्ज कायम ठेवले. त्यामुळे मनीषा टोपे यांनी माघार घेतली. याच वेळी उत्कर्षतर्फे जालन्याचे कपिल आकात यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे तिहेरी लढत होईल.
प्राचार्य गटात दोघांनी माघार घेतल्यामुळे उत्कर्षचे डॉ. जयसिंग देशमुख आणि मंचचे डॉ. सुभाष टकले यांच्यात लढत होईल. पदवीधर गटात सर्व सदस्य उत्कर्षचेच असल्यामुळे बिनविरोध निवडीची शक्यता होती. मात्र पहिल्यांदाच विजयी झालेले डॉ. नरेंद्र काळे यांना उमेदवारी दिल्यामुळे तीन वेळा विजयी झालेले प्रा. संभाजी भोसले यांनी माघार घेण्यास नकार दिला.
आ. चव्हाण यांचे विश्वासू असलेल्या डॉ. भारत खैरनार, प्रा. सुनील मगरे यांनी बंडखोरी न करता अर्ज मागे घेतल्यामुळे डॉ. काळे आणि प्रा. भोसले यांच्यात लढत होईल. यात विद्यापीठ विकास मंच प्रा. भोसले यांच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता आहे.
प्राध्यापक गटात दोघांत लढतव्यवस्थापन परिषदेसाठी प्राध्यापक गटात उत्कर्षतर्फे डॉ. राजेश करपे यांना उमेदवारी मिळाली. मंचतर्फे उस्मानाबादचे डॉ. गोविंद काळे यांना उमेदवारी दिली. या दोघांत सरळ लढत होणार आहे. या गटातही उमेदवारी मिळाली नसल्यामुळे डॉ. लक्ष्मीकांत शिंदे नाराज आहेत.