वाळूज महानगर : बजाजनगर पुन्हा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले असून, या परिसरातील मुख्य रस्त्यावर विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. या अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका बळावला असून, एमआयडीसी प्रशासनाचे या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
बजाजनगरातील मोरे चौक, मोहटादेवी चौक, जयभवानी चौक, आंबेडकर चौक, महाराणा प्रताप चौक आदी प्रमुख चौकांत विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. रस्त्याच्या कडेला पदपथावर अतिक्रमणे करून हॉटेल, रसवंती, हातगाड्या, फळविक्रेते आदी छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमणे करून आपले व्यवसाय थाटले आहेत. या छोट्या विक्रेत्यांकडे खरेदीसाठी परिसरातील ग्राहकांची गर्दी होत असल्यामुळे या प्रमुख चौकात सतत वाहतुकीची कोंडी होत आहे.
विशेषत: सकाळी ७ ते १० व दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत या चौकात ग्राहकांची गर्दी असते. अनेक ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. या भागातील मोठ्या व्यावसायिकांनी एमआयडीसीच्या जागेवर पोटभाडेकरू ठेवले आहेत. बहुतांश खुल्या जागा एमआयडीसीच्या असतानाही मोठे व्यावसायिक सदरील जागा आमच्याच असल्याचे भासवून छोट्या विक्रेत्यांकडून दरमहा भाडे वसूल करीत आहेत.
या छोट्या विक्रेत्यांनी पैसे देण्यास नकार देताच मोठे व्यावसायिक आमच्या दुकानासमोर अतिक्रमणे झाल्याच्या तक्रारी एमआयडीसी प्रशासनाकडे करीत असतात. त्यामुळे छोटे व्यावसायिक नाईलाजास्तव मोठ्या व्यावसायिकांना भाडे देऊन व्यवसाय करीत आहेत. परिसरातील गजबजलेल्या चौकातील अनेक दुकानदारांनी पार्किंगच्या जागा हडप केल्याचे आढळून आले आहे.
अतिक्रमणांमुळे अपघाताचा धोका वाढलाबजाजनगरातील मुख्य चौकात वाढत्या अतिक्रमणांमुळे अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पदपथ व मुख्य रस्त्यावर अनेकांनी व्यवसाय थाटल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.
एमआयडीसीकडून अतिक्रमणधारकांना अभयबजाजनगरातील मुख्य चौकात विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. दरम्यान, एमआयडीसी प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती. मात्र, काही काळानंतर पुन्हा अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना एमआयडीसी प्रशासन मोठ्या व्यावसायिकांना अभय देत असून, छोट्या व्यावसायिकांची अतिक्रमणे हटवीत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.