- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची चूक अत्याधुनिक यंत्रात कैद करून त्याच्या दंडाच्या पावत्या प्रतिष्ठितांसह राजकीय व्यक्तींनाही आॅनलाईन घरपोहोच मिळाल्याने सुसाट पळणाऱ्या वाहनांच्या वेगावर मर्यादा आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या इंटरसेप्टर यंत्राचा वापर बायपास, तसेच शहराबाहेरील रस्त्यावर केला जात आहे.
रस्ते अपघातातील कारणे लक्षात घेता वाहतूक नियमांचे सतत उल्लंघन करणाऱ्यांना रस्त्यात अडवूनही त्यांची मानसिकताच राहत नाही. त्यावेळी पोलीस कर्मचारी आणि वाहनचालकात वादाचे प्रसंग उद्भतात. त्यामुळे ‘हातच्या काकणाला आरसा कशाला’ या उक्तीप्रमाणे काळाची पावले ओळखून पोलीस यंत्रणाही अत्याधुनिकतेची कास धरताना दिसत आहे. औरंगाबाद शहर व लगतच्या महामार्गावरील वाहनांच्या वेगमर्यादेवर आळा घालण्यासाठी काही ठराविक वेगमर्यादा ठेवलेल्या आहेत; परंतु त्याचे पालन कोणीच करताना दिसत नसल्याचे आढळून आल्याने यावर आळा घालण्यासाठी ‘इंटरसेप्टर’ ही २ यंत्रे औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात आली आहेत. महाराष्ट्रभर अशा ९६ वाहनांचा समावेश यंदा शासनाने केला आहे. धोका ओळखून नियमांचे पालन केल्यास स्वत:चा, तसेच निष्पाप नागरिकांचा जीव वाचविण्यास आपला सहभाग असावा, हा यामागचा उद्देश आहे.
काळ्या काचा आणि मर्यादेपेक्षा गतीने वाहन चालविणाऱ्यांना इंटरसेप्टर यंत्र किमान तीन किलो-मीटरपासून देखील कॅप्चर करते आणि त्यातून पावती तयार करून त्याचा संदेश वाहनधारकांना जातो आणि त्याच्या घरीसुद्धा घरपोहोच पावत्या पाठविल्या जात आहेत. त्यात शहरातील अनेक राजकीय मंडळीदेखील सुटलेली नाहीत. नावे मात्र सूत्रांकडून सांगण्यात आलेली नाही.
यंत्रात दुजाभाव नाहीवाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर यंत्रातून स्थळ, वेळ, गुन्ह्याचा प्रकार, नंबर प्लेटच्या फोटोसह दंडात्मक पावती तयार होऊन वाहनधारकाच्या नावे मोबाईल नंबरवर संदेश जाऊन धडकतो. एवढेच नव्हे तर त्या यंत्राला दिलेल्या कमांडनुसार त्यात कोणीही सुटणे शक्य नाही. पोलीस कर्मचारीदेखील सुटणे शक्य नाही. शहर आणि महामार्ग अशा प्रत्येक रस्त्यावर वेगमर्यादेच्या पाट्या लावण्यात आलेल्या आहेत. अन्यथा तुमच्या नावे पावत्या जमा होऊन हायवेला तुम्ही ज्याही ठिकाणी सापडलात त्या ठिकाणी संपूर्ण आॅनलाईन दंड तुम्हाला अदा करावा लागेल. - शेषराव उदार (पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा)