औरंगाबाद : बँक खातेदाराचा मोबाईल क्रमांक बदलून त्यांच्या खात्यातून परस्पर १ लाख १९ हजार ५०० रुपये काढून फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध छावणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
तक्रारदार दिलीप फिलिप साठे (६१, रा. शांतीपुरा) यांचे पोस्टाने आलेले एटीएम कार्ड आरोपीने परस्पर मिळविले. बँकेत जाऊन त्याने स्वत: दिलीप असल्याची बतावणी करून दिलीप यांचा मोबाईल क्रमांक काढून त्याचा मोबाईल क्रमांक दिला. यामुळे बँक व्यवहाराचे मेसेज दिलीप यांच्या मोबाईलवर येणे बंद झाले. आरोपीने एटीएम कार्डचा वापर करून तक्रारदार यांच्या बँक खात्यातून परस्पर १ लाख १९ हजार ५०० रुपये काढून फसवणूक केली.
दिलीप बँकेत गेले असता त्यांच्या खात्यातील रक्कम कुणीतरी काढल्याचे त्यांना समजले. त्यांना या व्यवहाराचे मेसेज का आले नाही, याविषयी त्यांनी बँकेकडे विचारणा केली असता बँकेने त्यांच्या खात्याशी संलग्न मोबाईल क्रमांक सांगितला. तो त्यांचा क्रमांक नसल्याचे त्यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले. त्यांचा मोबाईल क्रमांक बदलून खात्यातील रक्कम काढल्याचा संशय बळावल्याने त्यांनी छावणी ठाण्यात तक्रार दिली.