छत्रपती संभाजीनगर: येथील विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच ३१ मे रोजी राज्य शासनाने राज्याचे फलोत्पादन आणि वनस्पती मंडळ संचालक पदी पदोन्नती देत पुणे येथे बदली केली. पदोन्नोतीचे आदेश मिळताच जाधव यांनी पुणे येथे जाऊन नवीन पदाचा पदभार घेतला. दिवसभर काम केल्यानंतर सांयकाळी ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीच्या दिवशीच जाधव यांना कृषीसंचालक पदाची लॉटरी लागल्याची चर्चा कृषी विभागात सुरू झाली.
मागील तीन वर्षापासून दिनकर जाधव हे छत्रपती संभाजीनगर विभागीय कृषी संचालकपदी कार्यरत होते. कृषी विभागातील संचालक पदासाठी पदोन्नतीसाठी ते पात्र होते, असे असताना कालपर्यंत त्यांच्या बढतीचे आदेश काढण्यात टाळाटाळ केली जात होती. कृषी विभागात ३२ वर्षाची सेवा देऊन ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. यामुळे नेहमीप्रमाणे ते बुधवारी सकाळीच कार्यालयात जाऊन बसले. तेव्हा सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांना फलोत्पादन आणि वनस्पती मंडळ संचालक पदी पदोन्नोती देत पुणे येथे बदली केली. हे आदेश प्राप्त होताच जाधव हे पुणे येथे गेले आणि आणि नवीन पदाचा पदभार घेतला. तेथे संचालकपदी काही तास काम केल्यानंतर सायंकाळी ६ वाजता सेवानिवृत्त झाले.