- विकास राऊत
औरंगाबाद : मंदीचा परिणाम औरंगाबादमधील उद्योगांच्या उत्पादनावर तर झालाच आहे, शिवाय त्याचा फटका महावितरण कंपनीलादेखील बसला आहे. मागील तीन महिन्यांत उद्योगांचा वीजवापर २० टक्क्यांनी कमी झाल्याने महावितरणच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांकडून मिळाली.
महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागााकडील डाटा उपलब्ध झाल्यानंतर मागील तीन महिन्यांत निश्चितपणे काय परिणाम झाला याचा अचूक अंदाज बांधता येईल, असेही सूत्रांनी सांगितले. डाटानुसार विश्लेषण होईलच; परंतु सध्या वीजवापर कमी झाला आहे, कारण बहुतांश उद्योगांनी उत्पादनांचे तास ४ ते ६ तासांनी कमी केले आहेत.
महावितरणला औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रातून जवळपास ४० कोटी रुपयांचा महसूल दरमहा बिल रूपाने मिळतो. तीन महिन्यांपासून ७ टक्के, १३ टक्के आणि २० टक्के असे कमी-अधिक वीजवापराचे प्रमाण असावे, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. वीजवापर कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम महसुलावर झाला आहे. तीन महिन्यांत मंदीमुळे महावितरणचेही सरासरी २० ते ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मसिआचे माजी अध्यक्ष किशोर राठी म्हणाले, अजून तरी मंदीच्या सावटातून उद्योग बाहेर आलेले नाहीत. परिणाम जाणवतोच आहे. उद्योगांमध्ये एकमेकांवर अवलंबून राहणारी साखळी असते. मंदीमुळे मोठ्या उद्योगांनी उत्पादन कमी केल्यामुळे लघु उद्योगांचे उत्पादनाचे तास कमी झाले आहेत. त्यामुळे वीजवापरदेखील कमी झाला आहे. अजून तरी उद्योग मंदीच्या सावटातून सावरलेले नाहीत. सरकार उपाययोजना करीत आहे, त्याचा फायदा झाला पाहिजे.
५ औद्योगिक झोन;वीजवापर कमीवाळूज, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, शेंद्रा आणि पैठण (बिडकीन, चितेगावसह) हे ५ औद्योगिक झोन औरंगाबादमध्ये आहेत. यामध्ये सुमारे ४ हजारहून अधिक लहान-मोठे उद्योग आहेत.मोठ्या उद्योगांपैकी बहुतांश उद्योग सौरऊर्जा वापराकडे वळले आहेत, तर काही पाईपलाईनमध्ये आहेत. त्यामुळे त्या उद्योगांचा वीजवापर तर कमी झालेलाच आहे, तसेच ज्या कंपन्या सोलारऐवजी महावितरणची वीज वापरतात, त्या कंपन्यांनी मंदीमुळे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे त्यांचे वीजवापराचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांवरही त्याचा परिणाम झाला आहे. मोठ्या आणि इतर लहान उद्योगांचे वीजवापराचे प्रमाण निश्चितपणे कमी झाल्याचे महावितरण कंपनीच्या विविध फिडरवरील आढावा घेतल्यानंतर समोर येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.