छत्रपती संभाजीनगर : ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद व त्यांच्या ८ शाखांचे ३५०० मंत्राचे पठण करीत वैदिकांनी आपल्या विद्वत्तेचे दर्शन घडविले. वेद मुखोद्गद जतन करणाऱ्या या वैदिकांचा यथोचित गौरव करण्यात आला. चार वेदाचे सुमारे ४०० पेक्षा अधिक वेदपाठी यानिमित्ताने दोन दिवस एकत्र आले. एकमेकांची भेट झाली, एकत्र मंत्रोच्चार केला, वेदावर सखोल चर्चा झाली, गौरव झाला, यामुळे सर्व वैदिकांनी परमानंद झाल्याचा भावना व्यक्त केल्या आणि वैदिक संमेलनाची शनिवारी सायंकाळी यशस्वी सांगता झाली.
दक्षिणाम्नाय श्रीमदजगतद्गुरू शंकराचार्य संस्थान, शृंगेरी, संत ज्ञानेश्वर वेद विद्या प्रतिष्ठान, दत्तधाम आणि श्रीकृष्ण गुरुकुल वेद पाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वैदिक संमेलन’ घेण्यात आले. शनिवारी दुसऱ्या दिवशी सकाळी वेद पारायणाने संमेलनाला सुरुवात झाली. प्रत्येक वेदाच्या पारायणासाठी २० ते २५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. यात प्रत्येक वेदाचे संहिता, पद, क्रम,जटा, माला, शिखा, रेखा, दंड, घन, पंचसंधीघन असे एकानंतर एक क्रमाने मंत्राचे पठण केले जात होते. संत ज्ञानेश्वर वेद विद्या प्रतिष्ठानने प्रधानाचार्य, वेदमूर्ती दुर्गादास मुळे, शृंगेरी शारदा पीठमचे प्रतिनिधी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या हस्ते ४०० वैदिकांचा सत्कार करण्यात आला आणि संमेलनाची सांगता झाली. यशस्वीतेसाठी वेदमूर्ती अनिरुद्ध देशमुख, प्रणव मुळे, प्रमोद झाल्टे, अनंत पांडव गुरुजी, विजय पाटणूरकर, गणेश जोशी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पुरुषोत्तम मासात वेद नारायण मांदियाळीवैदिकांना आम्ही वेद नारायण वेद म्हणजे परमेश्वराला जाणणे, पूर्वी चार वेदांचे मंत्र म्हटल्याशिवाय यज्ञ होत नव्हते, त्यानिमित्ताने चार वेदाचे वैदिक एकामेकांना भेटत. यासाठीच आम्ही वैदिक संमेलन भरविले होते. वेगवेगळ्या शाखेचे वेदपाठी एकत्र आले. पुरुषोत्तम मास सुरू आहे आणि हे वैदिक (वेद नारायण) ची मांदियाळी येथे भरली होती.- वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले