छत्रपती संभाजीनगर : गांधीनगरात बेधुंद तरुणांच्या कारने महिलांना उडवल्यानंतर जमावाने त्यांच्यावर तुफान दगडफेक करून अडवले. पोस्ट ऑफिस लोटा कारंजा रस्त्यावर कार थांबताच संतप्त जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. यात चार तरुण गंभीर जखमी झाले. या वेळी दोन्ही बाजूंनी गट आमनेसामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाल्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता होती. दरम्यान, ही गेल्या चार दिवसांतील तणाव निर्माण होणारी पाचवी घटना होती.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, इर्टिगा गाडीमध्ये चार तरुण बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास बापूनगर परिसरात गेले होते. मित्रांकडील काम झाल्यानंतर ते सुसाट वेगात निघाले. त्यांनी जाताना सुरुवातीला काही दुचाकींना उडवले. त्याच वेगात त्यांनी अरुंद रस्त्यावरून गाडी पळवली. तोपर्यंत स्थानिकांनी धाव घेतली. कारचालकाने पुढे काही महिलांना उडवल्यानंतर मात्र रहिवासी संतप्त झाले. तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. तुफान दगडफेक झाली. त्यात कार अडवून जमावाने चौघांना कारच्या बाहेर ओढले.
दीडशे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तकाही तरुणांनी कारवर हल्ला चढवला, तर इतरांनी कारमधील चौघांना बेदम मारहाण सुरू केली. जवळपास अर्धा तास मारहाण सुरूच होती. दगडफेकीमुळे परिसरात अफवा पसरली, दोन्ही बाजूंनी मोठा जमाव जमला. घटनेची माहिती कळताच पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, संतोष पाटील यांच्यासह सुमारे दीडशे ते दोनशे पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
दोघांची प्रकृती गंभीरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत शेख इस्माईल शेख इब्राहिम (रा. अल्तमश कॉलनी), वसीम (रा. हुसेन कॉलनी), सय्यद इम्रान सय्यद नसीम आणि अबुझर सय्यद मुमताज अली (रा. बायजीपुरा) हे जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती रात्री उशिरापर्यंत गंभीर होती. मारहाणातील चार ते पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. स्थानिकांच्या माहितीनुसार, यातील काही तरुण बेधुंद होते. ते नेहमी या परिसरात येत असतात.
घटनास्थळी दगडांचा खच, शहरात अलर्टघटनास्थळी दगडांचा मोठा खच पडला होता. तोडफोडीमुळे रस्त्यांवर वाहनांच्या काचांचा भुगा झाला होता. घटनेचे पडसाद इतरत्र उमटू नयेत, यासाठी पोलिसही तयारीनिशी दाखल झाले. शहरात सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला. रात्रपाळीवरील अधिकाऱ्यांसह ठाणेप्रमुखांना हद्दीमध्ये गस्त घालण्याची सूचना करण्यात आली.