छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यातील पहिल्या आठवड्यानंतर तिसऱ्या आठवड्यातील गुरुवार शहरवासीयांसाठी हॉट ठरला. मंगळवारी कमाल तापमानाचा पारा ४१.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेला, बुधवारी ४१.४ अंश सेल्सिअस तर गुरुवारी ४३.५ अंश सेल्सिअस इतके तापमान चिकलठाणा वेधशाळेत नोंदविले गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक जास्त तापमानाची नाेंद गुरुवारी झाली. २०२० सालचा रेकॉर्ड या तापमानाने मोडला. सूर्याने अक्षरश: आग ओकली.
गुरुवारी किमान तापमानही २९.४ अंश सेल्सिअस होते. दिवसा उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी फॅन, एसी, कूलरच्या थंड हवेत बसणे पसंत केले. शासकीय सुटी असल्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर तुरळक गर्दी होती. यंदा एप्रिल महिन्यात सुरुवातीलाच तापमान चाळिशीपार गेले. त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. रात्री उकाडा आणि विजेचा लपंडाव, यामुळे नागरिक यंदाचा उन्हाळा विसरणार नाहीत. मे महिन्यात वैशाख वणवा पेटल्याप्रमाणे उष्णतेच्या झळा, घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त होत आहेत. दोन दिवसांपासून पुन्हा उकाडा वाढला आहे. पूर्व मोसमी हंगामाला अजून सरासरी १८ दिवस बाकी आहेत. त्यामुळे अवकाळी, उष्णतेची लाट असे वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस तापमान वाढेल, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे.
एमजीएममध्ये ४२.२ अंश सेल्सिअसची नोंदएमजीएमच्या वेधशाळेत ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. येत्या ३६ तासांत पूर्व मान्सूनच्या सरी बरसतील, असा अंदाज आहे. शुक्रवारी पाऊस येऊ शकतो, असेही औंधकर यांनी सांगितले.
यंदाच्या उन्हाळ्यातील हॉट डे५ एप्रिल : ४१.६ अंश सेल्सिअस१८ एप्रिल : ४२.२ अंश सेल्सिअस५ मे : ४१.६ अंश सेल्सिअस६ मे : ४१.२ अंश सेल्सिअस२१ मे : ४१.६ अंश सेल्सिअस२२ मे : ४१.४ अंश सेल्सिअस२३ मे : ४३.५ अंश सेल्सिअस
२०२० ते २०२४ पर्यंतचे तापमान....२५ मे २०२०: ४३.१ अंश सेल्सिअस२८ एप्रिल २०२१: ४१ अंश सेल्सिअस१३ मे २०२२: ४१.८ अंश सेल्सिअस९ सप्टेंबर २०२२: ४३.२ अंश सेल्सिअस२३ मे २०२४: ४३.५ अंश सेल्सिअस