पाचोडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोसंबी खरेदी केंद्र आहे. दरवर्षी पाचोडला आंबा बहारमधील मोसंबी व मृग बहारमधील मोसंबी शेतकरी पाचोडच्या मोसंबी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणू लागले आहेत. या मोसंबी मार्केटमुळे शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.
पाचोड गावासह पैठण तालुक्यात दहा हजार हेक्टरवर मोसंबीचे पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. परिसरातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुद्धा अंदाजे सात ते आठ हजार हेक्टरवर मोसंबी लागवड केलेली आहे. मोसंबीचे पीक नगदी पीक असल्यामुळे तसेच कमी खर्चीक असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे पाणी मुबलक प्रमाणात आहे, ते मोसंबी लागवड करीत आहेत. मागील वर्षी पाचोड परिसरात सर्वत्र चांगला पाऊस पडल्यामुळे यावर्षी बऱ्यापैकी विहिरीला पाणी आहे. यामुळे गावागावात मोसंबी लागवड वाढली आहे.
पाचोडला मोसंबी खरेदी केंद्र असल्यामुळे याठिकाणी मराठवाड्यातील शेतकरी आपली मोसंबी विकण्यासाठी पाचोडला आणत असतात. पण, काही कारणास्तव जर शेतकऱ्यांची मोसंबी विक्री होऊ शकली नाहीतर, मोसंबी खराब होऊ नये, यासाठी पाचोडला मोसंबी खरेदी केंद्रात कोल्ड स्टोरेज सेंटरला मंजुरी मिळाली आहे. बारा कोटी रुपये खर्च करून हे कोल्ड स्टोरेज सुरू झाल्यावर आपली मोसंबी शेतकरी पंधरा दिवस याठिकाणी ठेवू शकतील व चांगला भाव आल्यावर विकू शकतील.
चौकट...
पैठणला होणार मोसंबी संशोधन केंद्र
मोसंबीला चांगले मार्केट यावे, यासाठी राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी मोसंबी संशोधन केंद्रासाठी पाठपुरावा केला होता. यामुळे शासनाने पैठणला मोसंबी संशोधन केंद्र मंजूर केले आहे. त्यामुळे तालुक्यात आता मोसंबीचे संशोधन होणार आहे. या संशोधन केंद्राचा फायदा औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तर होणारच आहे, मात्र आजूबाजूच्या जिल्ह्यातही मोसंबी लागवड वाढण्यासाठी होईल.