पैठण (औरंगाबाद ) : पैठण तालुक्यात सोमवारी पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. गेल्या काही दिवसा पासून दडी मारलेला पाऊस तालुक्यात धौधो बरसल्याने महत्वाच्या नद्या नाले व ओढ्यांना पूर आला. विरभद्रा नदीला आलेल्या महापुराने गेल्या २४ तासापासून नांदर गावाचा संपर्क तूटला आहे. शेतशिवारात व उभ्या पिकात पाणीच पाणी साचले आहे.
गेल्या १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. परंतु, सकाळी जमा झालेले ढग न बरसताच निघून जात असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती. सोमवारी दुपारनंतर तालुक्यात पावसास प्रारंभ झाला. बालानगर, आडूळ, पाचोड, विहामांडवा व नांदर महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील वीरभ्रदा या प्रमुख नदीस महापूर आला. यामुळे नांदर या मोठ्या गावाचा संपर्क मंगळवारी सकाळी १० वाजे पर्यंत बंद होता. अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटले होते. पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतशिवारातील उभ्या पिकात पाणी साचल्याने काही भागात पिकांच्या नुकसानीस हा पाऊस कारणीभूत होणार आहे.
पैठण तालुक्यात सोमवारी पैठण २५ मि मी (३७४), पिंपळवाडी पिराची ३८ मिमी (३८९) , बिडकीन १०मिमी (३९७),ढोरकीन ४४ मिमी (३८३), बालानगर ८५ मि मी (३९८), नांदर ८१मि मी (४०६), आडूळ ६६ मिमी (३८३), पाचोड ७५ मिमी (३८४), लोहगाव १५ मिमी (३७५),विहामांडवा ९३ मिमी (४७५) अशी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी तालुक्यात एकूण ५३२ मिमी पाऊस झाला असून सरासरी ५३.२० मिमी ईतकी नोंद झाली आहे. तालुक्यात आजपर्यंत एकूण पाऊस ३९६४ मिमी झाला असून एकूण सरासरी पैकी ३९६.४० मिमी ईतका पाऊस झाल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.