छत्रपती संभाजीनगर: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी फुटण्याचे आणि शहराला निर्जळीचा सामना करावा लागतो. सतत घडणाऱ्या या घटनांची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गिनीज बूकच्या संस्थेला पत्र पाठविले आहे. या पत्राची एक प्रत मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांना दिली.
मनसेने जिल्हा उपाध्यक्ष संकेत शेटे यांनी याविषयी प्रसिद्धी पत्रात नमूद केले की, शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सतत फुटत असते. जलवाहिनी फुटल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. आजही पुन्हा जलवाहिनी फुटल्याचे कळाले. जलवाहिनी फुटण्याचे हे रेकॉर्ड मनपा प्रशासन उत्तरोत्तर करीत आहेत. मनपाच्या या जागतिक विक्रमाची नोंद घ्यावी असे आवाहन लंडन येथील गिनीज बुक रेकॉर्डच्या कार्यालयाला पत्र पाठवून केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक पाण्याच्या प्रश्नामुळे त्रस्त आहेत. निवडणुका झाल्या, शहराला मंत्री पदे मिळाली, पैठण येथील जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे. असे असूनही शहरवासियांना ७ ते ९ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.
दसरा, दिवाळी सारखे सणातही ही परिस्थिती कायम आहे. पाणी नाही मिळाले तरी शहराचे नाव या गिनीज बुक रेडॉर्डमध्ये नोंदवल्या जाईल, यामुळे महापालिकेचे नाव जगभरात पोहोचेल अशी खोचक खंत व्यक्त केली. हे निवेदन मनपा प्रशासक यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे संकेत शेटे, महानगर अध्यक्ष बिपीन नाईक, सचिव राहुल पाटील, वाहतुक शाखेचे जिल्हाध्यक्ष मनिष जोगदंडे उपस्थित होते.