हिंगोली : एका कंपनीची खोटी जाहिरात करून गुंतवणुकदारांनी दामदुप्पट योजनेत भरलेले १७ लाख १० हजार रुपये गायब करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोघांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. या प्रकरणात पुरावे गोळा करण्यासाठी फसवणूक झालेल्या साक्षीदारांचे जबाव नोंदविण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली. या प्रकरणात शेषराव अर्जुनराव चाटसे (वय ३५, रा. जिजामातानगर, हिंगोली) यांच्या फिर्यादीवरून आरोपी श्रावण गणपत माने, सविता श्रावण माने (दोघे रा. प्लॉट नं. ०१, गंगा बिल्डींग को- आॅपरेटिव्ह सोसायटी, आनंद पार्कजवळ, ठाणे) यांच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा फसवणुकीचा प्रकार मागील सहा वर्षांपासून ६ मेपर्यत झाला आहे. त्या दोघांनी कंपनीबाबत खोटी जाहिरात केली. गुंतवणुकदारांनी सदर कंपनीत पैसे गुंतवले. दुप्पट रक्कम तीन वर्ष व सहा वर्षाच्या मुदतीनंतर देणे असल्याने पैशांऐवजी त्यांनी शेषराव चाटसे व इतर गुंतवणुकदारांना धनादेश दिले होते. सदरील धनादेश देणाऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम शिल्लकच नसल्याचे उघडकीस आले. आरोपी श्रावण गणपत माने, सविता श्रावण माने या दोघांनी २०१० मध्ये मातृभुमी नावाच्या कंपनीचे काम सुरू केले होते. दरम्यान, व्यवस्थापनाशी वाद झाल्याने त्यांनी नवीन फिनिक्स रिअल कॉन गोल्ड नावाची बनावट कंपनी सुरू केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या कंपनीच्या नावे लोकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडून त्या दोघांना अशा प्रकारे १२५ जणांना गंडविले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सतीश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)
फसवणुकीच्या तपासासाठी साक्षीदारांचे जबाब नोंदविणार
By admin | Published: July 15, 2014 12:08 AM