तुळशीदास घोगरे , घनसावंगीतीन वर्षांपूर्वी घनसावंगी तालुक्यास तंटामुक्त गाव समितीचा प्रथम पुरस्कार म्हणून ४२ ग्रामपंचायतींना १ कोटी ३३ लाखांचे बक्षीस मिळाले होते. मात्र आज रोजी या ग्रामपंचायतींकडे या संबंधी कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचेसमोर आले आहे. मिळालेल्या बक्षीसामधून तंटामुक्त अध्यक्षांनी गावासाठी पथदिवे, पाणीटंचाई, नालीकाम, शाळेचे काम, गरीब कुटुंबांना आर्थिक साह्य, विद्यार्थ्यांना बक्षीस योजना अशा अनेक योजना राबविण्याचा महाराष्ट्र शासनाचा आदेश आहे. यामध्ये झालेल्या खर्चाचा हिशेब ग्रामपंचायतींनी ठेवणे बंधनकारक आहे. यामध्ये काम झाल्यानंतर त्याचे रेकॉर्ड तयार करून अध्यक्षांनी त्या रकमेचा रोख धनादेश त्या कामाच्या नावाने देणे गरजेचे असते. याचे संयुक्त खाते, ग्रामसेवक, अध्यक्ष व पोलिस निरीक्षक यांचे असते. या खाते उघडण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला गटविकास अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. घनसावंगी तालुक्यात अनेक गावांचे खाते हे ग्रामसेवकांनी न घेता अध्यक्ष व पोलिस निरीक्षक यांच्यातच उघडून अनेक गावांची रक्कम गायब झालेली आहे. याचा हिशेब बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये नाही. झालेल्या कामाचे आॅडीट पंचायत समितीने करणे गरजेचे आहे. त्यावेळी त्या खात्याचा ग्रामसेवकांचा काही संबंध न आल्यामुळे त्यांचे आॅडीटच झाले नाही. या रकमेचा पोलिस निरीक्षक व अध्यक्षांनी संयुक्तरित्या गायब केल्याची अनेक गावाच्या तक्रारी आहेत. घनसावंगी पोलिस ठाण्यात अनेकांनी या रकमेचा हिशेब मागण्यासाठी अर्ज केले आहेत. परंतु पोलिसांकडून असे सांगण्यात येते की, पं.स.कडे आॅडीट प्रत मागविली आहे. त्यानंतर माहिती देण्यात येईल, असे पोलिस उपनिरीक्षक बांगर म्हणाले. पंचायत समितीमध्ये कोणतेच रेकॉर्ड नसल्याचे सांगण्यात आले. पोलिस ठाणे व पोलिस अधीक्षक कार्यालयास अहवाल पाठविला असल्याचे बीडीओ सुधीर ठोंबरे यांनी सांगितले. चिंचोली येथील ग्रामविस्तार अधिकारी पी.पी. तायडे यांनी माहितीच्या अधिकारात सांगितले की, आमच्याकडे या रक्कमेचा पैसा ग्रामपंचायतीला वर्गच झाला नाही. टेंभी अंतरवाली, मांदळा, मासेगाव, साकळगाव, मूर्ती, शिवनगाव, राजाटाकळी, श्रीपत धामणगाव, कु. पिंपळगाव, भादली, उक्कडगाव, म. चिंचोली, जिरडगाव, देवहिवरा, माहेर जवळा, ढाकेफळ, आरगडे गव्हाण, जांब समर्थ, मंगू जळगाव, गुरू पिंपरी, शिंदेवडगाव, करडगाव वाडी, मोहपुरी, बोधलापुरी, बहिरगड, सरफगव्हाण, पानेवाडी, गुंज बु., पिरगैबवाडी, खालापुरी, दहिगव्हाण, हातडी, बोरगाव, पाडोळी, मुरमा, खडका, पांगरा, पारडगाव, आवलगाव, यावलपिंप्री, देवडी हदगाव, रांजणी या ४२ गावांना मिळून १ कोटी ३३ लाखांचे बक्षीस मिळाले होते.
तंटामुक्त गावांचे रेकॉर्डच गायब..!
By admin | Published: March 15, 2016 12:12 AM