औरंगाबाद : क्रेडिट कार्डच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी एका महिलेकडे रिकव्हरी एजंटने शरीरसुखाची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. रिकव्हरी एजंटने सातत्याने महिलेला आणि तिच्या पतीला फोन करून मानसिक त्रास दिला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरु आहे.
शहरातील एका महिलेने क्रेडिट कार्डवर ४६ हजारांची खरेदी केली. २५ हजारांचे बिल भरले. पण नंतर कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला. बँकेनं आपल्या ग्राहकांकडील थकीत कर्ज आणि हफ्ते वसुल करण्याचं काम थर्ड पार्टीला दिलं आहे. २१ हजार रुपय थकल्याने रिकव्हरी एजंटने तगादा सुरू केला. एवढ्यावरच न थांबता शिवीगाळ करत शरीरसुखाची मागणी करणारे मेसेजही केले. यामुळे महिलेने एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष करत कोणतीही कारवाई केली नसल्याचे महिलेने म्हटले आहे.
यानंतर एजंटकडून त्रास वाढत गेल्याने महिलेने पुन्हा तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला. शिवाय अश्लील मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीच्या तपासाच्या नावाखाली पोलीस फिर्यादी महिलेच्या पतीला दिल्लीला घेऊन गेले, असा आरोपही पीडित महिलेनं केला आहे.