लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तब्बल ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणताच आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने चौकशी समिती नेमून झालेले नुकसान दोषींकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण गैरकारभाराला कोण जबाबदार आहे, हे निश्चित करून कारवाई केली जाणार आहे.शासनाच्या भांडार पडताळणी पथकाने औषधी कालबाह्य झाल्याचा हा प्रकार उघडकीस आणला असून, दोषी अधिकारी व कर्मचाºयांवर त्वरित जबाबदारी निश्चित करून शासनाला अनुपालन अहवाल सादर करावा, अशी शिफारस आरोग्य उपसंचालकांना केली आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने २१ नोव्हेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. वृत्त प्रकाशित होताच या प्रकरणात सापडू नये म्हणून अधिकारी-कर्मचाºयांची सारवासारव सुरू झाली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांसाठी शासनाकडून औषधी पुरवठा केला जातो. एकीकडे ३८ कोटी रुपये खर्च करून चिकलठाण्यात भव्य-दिव्य जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत उभी आहे. मागील दोन वर्षांपासून विद्युत विभागाची कामे, नळजोडणी, कर्मचारी भरती, अद्ययावत यंत्रसामग्री खरेदी आदी कारणे सांगून लोकार्पण टाळण्यात येत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील रुग्णालयात औषधींसह विविध आरोग्य सुविधांची वानवा आहे. अशा परिस्थितीत औषधी साठ्यातील ५८ लाख ३८ हजार ६४७ रुपयांची औषधी एक्स्पायर झाली आहे. शासनाच्या भांडार पडताळणी अधिकाºयांच्या पथकाने सामान्य रुग्णालयाच्या भांडार विभागाची चौकशी केली असता हे विदारक सत्य समोर आले. पथकाने त्वरित संपूर्ण औषधीचा पंचनाम केला आहे. ही बाब आरोग्य उपसंचालकांनी गंभीरतेने घेतली आहे. संपूर्ण प्रकरणाचा चौकशी समितीमार्फत पडताळणी करण्यात येत आहे. आॅडिटमध्ये जी बाब समोर आली, तसेच असेल तर दोषींकडून नुकसानीची वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोषी असणा-यांकडून करणार वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:50 AM