हिंगोली : जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या अपहाराच्या प्रकरणांत वसुलीची कारवाई अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. शिवाय जेथे ग्रामसेवकासोबत सरपंचही अशा प्रकरणांत अडकले तेथे दोघेही दाद देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजून दीड कोटींची वसुली होणे बाकी आहे.मागील काही वर्षांत जि. प. च्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर गैरव्यहार झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशा प्रकरणांची चौकशी केल्यानंतर त्यांचे अहवालही जि. प. ला सादर झालेले आहेत. त्याचे एकत्रिकरण केल्यानंतर अशी ८६ प्रकरणे आढळून आली होती.अशा प्रकरणांनमध्ये काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल रेखावार यांनी कठोर भूमिका घेत वसुलीचे आदेश दिले होते. तसेच लोकप्रतिनिधी अशा प्रकरणांमध्ये दोषी असल्यास त्यांच्याकडूनही एकतर वसुली नाहीतर आरआरसीची प्रकरणे करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे थोडीबहुत गती मिळाली होती. त्यानंतरही काहीकाळ याबाबत प्रशासन खंबीर भूमिका घेत असल्याचे दिसून आले होते. मात्र आता पुन्हा त्यात शिथिलता आली आहे. त्यामुळे वसुलीचा आकडा पुढे सरकायचे नाव घेत नाही. हिंगोली-६, औंढा-१४, कळमनुरी ३, वसमत-४, सेनगाव-३ अशा ३0 प्रकरणांमध्ये तर आरआरसीची प्रकरणे करण्याची वेळ प्रशासनावर आली असल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)
दीड कोटींची वसुली बाकीच
By admin | Published: April 24, 2016 11:23 PM