लातूर : मे महिन्यातील तहान भागविण्यासाठी आता सांडपाण्याचे पुनर्भरण करण्याची गरज निर्माण झाली असून, आर्ट आॅफ लिव्हिंगने हा उपक्रम हाती घेतला आहे. टॉयलेटचे पाणी वगळून अन्य ७० टक्के वापरलेले पाणी गटारीतून वाया न घालविता त्याचे पुनर्भरण करण्याचा हा उपक्रम टंचाईवर मात करेल, असा दावा आर्ट आॅफ लिव्हिंगने केला आहे. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून सांडपाण्याचे पुनर्भरण करण्याचा उपक्रम सध्या शहरात सुरू आहे. अपार्टमेंट व वैयक्तिक घरांतील सांडपाणी गटारीद्वारे वाया न जाऊ देता जमिनीत मुरविण्यात येत आहे. सांडपाणी जमिनीत मुरविल्यानंतर महिनाभरात परिसरातील बोअर रिचार्ज होत आहेत. हा रिझल्ट आर्ट आॅफ लिव्हिंगने समाजासमोर ठेवला आहे. त्यामुळे मनपानेही १५ हजार घरांतील सांडपाणी वाया न जाऊ देता जमिनीत मुरविण्यास मदत करण्यास होकार दिला आहे. एका अपार्टमेंटमध्ये साधारणपणे १० ते १५ हजार लिटर्स पाणी टॉयलेट वगळून अन्य कामांसाठी वापरले जाते. सदर सांडपाणी गटारीतूनच वाया जाते. ते वाया जाऊ न देता जमिनीत मुरविले तर त्यातील किमान ३० टक्के पाणी परत रिचार्ज होऊ शकते. सर्वसाधारण घरासाठी ५ बाय ५ चा खड्डा व अपार्टमेंटसाठी १० बाय ८ किंवा १० बाय १० असा खड्डा करून त्यात मोठी खडी, ३ बाय २.५ छिद्र असलेली सिमेंट टाकी, बाहेर वाळू, खडी व कोळसा टाकून पाणी फिल्टर होऊन जमिनीत मुरते. ते पुन्हा रिचार्ज होऊन पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होत आहे. ग्रामीण भागात हा प्रयोग झाला असून, त्याचा चांगला रिझल्ट आहे. आता शहरातही अपार्टमेंट व घरा-घरांतून वाया जाणारे सांडपाणी जमिनीत मुरविल्यामुळे पाणीपातळीत वाढ होत आहे, असा दावा आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वयंसेवक महादेव गव्हाणे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
सांडपाण्याचेही पुनर्भरण; महिन्यात रिझल्ट !
By admin | Published: February 19, 2016 12:21 AM