औरंगाबाद : गोरगरीब, सर्वसामान्यांची प्रवासवाहिनी असलेली ‘लाल परी’ म्हणजेच एस.टी.ची सेवा कोरोना विळख्यात आता कुठे सुरळीत होत होती; पण गेल्या महिन्याभरात कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावाचा ‘एस.टी.’ला पुन्हा एकदा फटका बसत आहे. प्रवासी संख्या आणि उत्पन्नात मोठी घट झाल्याने ‘एस.टी.’ सेवा ‘रिव्हर्स गिअर’मध्ये गेली आहे. अन्लाॅकनंतर प्रारंभी ५० टक्के आसन क्षमतेवर एस.टी. बसेस धावत होत्या. त्यानंतर पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने एस.टी. धावू लागली. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आधार मिळाला. कोरोनाच्या विळख्यानंतर एस.टी. महामंडळाच्या औरंगाबाद विभागाचे रोजचे उत्पन्न ४५ लाखांपर्यंत गेले. त्यामुळे ‘एस.टी.’चा आर्थिक गाडा पुन्हा एकदा रुळांवर येत असल्याचे म्हटले जात होते; परंतु फेब्रुवारीत कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले. औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी रुग्णसंख्येत वाढ झाली. परिणामी, अनेकजण प्रवास टाळत आहेत. त्यातून प्रवासी संख्या घटली. ‘एस.टी.’चे उत्पन्न ३१ लाखांपर्यंत घसरले आहेे; तर प्रवासी भारमान ४२ टक्के झाले आहे. म्हणजे अर्धी बसही भरत नसल्याची परिस्थिती आहे.
प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण
प्रवासापूर्वी प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण केले जाते. मास्क असेल तरच प्रवाशांना आतमध्ये प्रवेश दिला जातो; त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----
औरंगाबाद जिल्ह्याची स्थिती
एकूण बसेस - ५५०
एकूण रोजच्या फेऱ्या - ६,२२२
आगार -८
प्रवासी भारमान - ४२ टक्के
रोजचे उत्पन्न-३१ लाख रुपये
----
उत्पन्नात घट, पण सेवा सुरळीत
बसगाड्यांचे भारमान ४२ टक्के झाले आहे. दररोजचे उत्पन्न ४५ लाखांवरून ३१ लाखांपर्यंत घसरले आहे. उत्पन्नात १४ लाखांची घट झाली आहे. तरीही कोणत्याही बसेस बंद करण्यात आलेल्या नाहीत. प्रवासी संख्या पाहून बसेस सोडण्यात येत आहेत.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एस.टी. महामंडळ