लासूर स्टेशन : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लाखो रुपये खर्च करुनही टोमॅटो विक्रीला नेल्यानंतर वाहनखर्चही निघेनासा झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासूर स्टेशन येथील सावंगी चौकात सहा ट्रॅक्टर भरुन टोमॅटो रस्त्यावर फेकले. यामुळे या चौकात लाल चिखल झाला होता. शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करुन हमीभाव देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. हे पिक घेताना खुप कष्ट पडते. मात्र, उत्पादन चांगले आले तर, आर्थिक हातभार लागेल या आशेने शेतकरी टोमॅटो पिकाकडे वळले आहेत. या पिकासाठी लागवड खर्च, किटकनाशक फवारणी खर्च, टोमॅटो बांधणी, निंदणी, कोळपणीसह काढणीसह हिशेब केला तर, एकरी एक लाख रुपयांपेक्षाही जास्त खर्च येतो. महागाईच्या काळात तो खर्चही आता वाढला आहे. तसेच पावसाने टोमॅटोवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. एवढे असूनही बाजारात सध्या २२ ते २५ किलोंच्या एका टोमॅटोच्या कॅरेटला केवळ पन्नास रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या भावामुळे शेतकऱ्यांना नफा तर दुरच मात्र, वाहनभाडेही खिशातून भरावे लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी झाडांवरच टोमॅटो सडू देणे पसंद केले आहे.
टोमॅटोला भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी लासूर स्टेशन येथील सावंगी चौकात सहा ट्रॅक्टरभरुन टोमॅटो आणून रस्त्यावर टाकले. यामुळे परिसरात नुसता लाल चिखल झाला होता. यावेळी शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. या आंदोलनात शेतकरी नेते संतोष जाधव, उपसरपंच रवींद्र चव्हाण, आण्णासाहेब जाधव, संजय पांडव, अमोल जाधव, नितीन कऱ्हाळे, गणेश तायडे, राजेंद्र थोरात, संजय चव्हाण, रमेश तायडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी केल्या या मागण्याटोमॅटोला प्रतिकॅरेट ५०० रुपये हमी भाव जाहीर करावा, बंद केलेल्या टोमॅटोची निर्यात बंदी तात्काळ उठवावी, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून एकरी ५० हजार रुपये अनुदान मंजूर करावे. लासूर स्टेशन येथे टोमॅटो प्रक्रिया उद्योग सुरु करावा, अशी मागणी केली.